सांगली : महापालिकेच्या शाळांमध्ये सॅनिटरी व्हेंडिंग मशीन बसवण्याचा निर्णय बुधवारी महिला बालकल्याण समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. शालेय मुलींसाठी कराटे प्रशिक्षणाबरोबर समुदेशन केंद्रही सुरू करण्यात येणार असल्याचे सभापती गीतांजली ढोपे पाटील यांनी सांगितले.
महापालिकेत महिला व बालकल्याण समिती सभा पार पडली. सभेस सभापती गीतांजली ढोपे पाटील, नगरसचिव चंद्रकांत आडके, विभागप्रमुख अशोक माणकापुरे यांच्यासह सर्व महिला सदस्य या सभेला उपस्थित होत्या. या सभेत मुलींसाठी कराटे प्रशिक्षण, समुपदेशन केंद्र उभारणे, महिलांची रिक्त पदे भरणे, तक्रार निवारण कक्ष सुरू करणे, शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारणे, महिलांसाठी प्रशिक्षण, प्रसूतिगृहाची सुधारणा, महिला बचत गटांना महापालिकेची कामे देणे, ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती, महिलांसाठी महापालिकेत स्वतंत्र विश्रांती कक्ष उभारणे आदी निर्णय घेण्यात आले.