सांगली : कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे जिल्हा परिषद ओस पडत आहे. गेल्या आठवड्यात तब्बल १५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे सर्वांनीच धास्ती घेतली आहे. पदाधिकारी, सदस्यही जिल्हा परिषदेकडे कोरोनामुळे फिरकत नसल्याचे दिसून येत आहे. काही पदाधिकारीही आजारी असल्याची चर्चा जिल्हा परिषदेत सुरू झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक सुरू झाला आहे. रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने सर्वांनाच पुन्हा याची धास्ती लागली आहे. जिल्हा परिषदेतील तब्बल १५ कर्मचाऱ्यांना नव्याने कोरोनाची बाधा झाली आहे. याशिवाय आणखी काहींना याची बाधा झाल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्हा परिषदेतील बाधितांची संख्या वाढत असल्याने अधिकारी, पदाधिकारी, सदस्य, कर्मचारी चांगलेच धास्तावले आहेत. दक्षता म्हणून प्रशासनाने १ एप्रिलपासून जिल्हा परिषदेत सर्वसामान्यांना प्रवेशबंदी केली आहे. बाधितांची संख्या वाढत असल्याने सर्वांनीच दक्षता म्हणून विनाकारण होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्हा परिषदेत येणे टाळल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे. सदस्य पदाधिकारीही फिरकले नाहीत. मार्चअखेरला असणारी गर्दीही फारच कमी दिसून आली.
चौकट
पदाधिकारी गायब, इच्छुकांचा तळ
कोरोनाच्या धास्तीने जिल्हा परिषदेमध्ये पदाधिकारी, सदस्य फिरकत नसले तरी पदासाठी इच्छुक असलेल्यांनी मात्र आपला तळ ठोकल्याचे दिसून आले. गेल्या काही दिवसांपासून या सदस्यांनी पदाधिकारी बदलून नव्यांना संधी देण्याच्या मागणी यासाठी नेत्यांकडे प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र अद्याप निर्णय झाला नाही. त्यामुळे इच्छुकांची धास्ती अधिक वाटत आहे. बदल न केल्यास काय भूमिका घ्यावयाची यासाठी इच्छुक मंडळी रोज जिल्हा परिषदेमध्ये एकत्रित येऊन चर्चा करताना दिसत आहेत. समाजकल्याण सभापतींच्या दालनात बसून ते फिल्डिंग लावताना दिसतात.