सांगली : कोरोनामुळे एकूणच जनजीवन विस्कळीत बनले असताना, आरोग्य सेवांवरही त्याचे परिणाम जाणवू लागले आहेत. कोविड रुग्णांचे प्रमाणही वाढत असल्याने संसर्गाचा धोका ओळखून नेत्रशस्त्रक्रियाही बंद करण्यात आल्या आहेत. गेल्या १५ दिवसांपासून शासकीय रुग्णालयातील नेत्रचिकित्सा विभागातील शस्त्रक्रिया बंद ठेवण्यात आल्या आहेत.
प्रशासनाने कोविड, नॉन कोविड रुग्णांच्या उपचाराची सोय केली असली तरी आता महिनाभरापासून कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यानेही इतर विभाग बंद ठेवण्यात आले आहेत. नेत्र शस्त्रक्रिया करणाऱ्या रुग्णांमध्ये ज्येेष्ठांची संख्या मोठी असते. जिल्हा रुग्णालयात कोरोना अगोदर उद्दिष्टांपेक्षा जादा शस्त्रक्रिया होत होत्या.
मोतीबिंदूसह डोळ्यांच्या अन्य तक्रारींसाठी शासकीय रुग्णालयातील नेत्रचिकित्सा विभागाकडून नेहमीच प्राधान्य दिले जाते. सांगलीत तर पाच जिल्ह्यातील रूग्णांवर उपचार केले जातात त्यामुळे नेत्र शस्त्रक्रियांसाठी नेहमीच गर्दी असते. कोरोना कालावधीतही त्यामुळेच आवश्यक त्या खबरदारी घेऊन हा विभाग सुरू ठेवण्यात आला होता. आताच १ मेपासून कोरोना संसर्ग वाढल्याने नियमित शस्त्रक्रिया बंद करण्यात आल्या आहेत तर अत्यावश्यक शस्त्रक्रिया अजूनही सुरू आहेत.
चौकट
कोरोनाचा कहर कमी झाल्यानंतर शासकीय रुग्णालयातील नेत्रचिकित्सा विभागाने शस्त्रक्रिया पुन्हा चालू केल्या होत्या. त्यामुळे राज्यात इतर ठिकाणी वर्षभर शस्त्रक्रिया बंद असताना इथे मात्र, काळजी घेऊन त्या सुरू होत्या. आता शासनाच्या निर्देशानुसार पुन्हा एकदा थांबविण्यात आल्या आहेत.
कोट
कोरोना कालावधीअगोदर उद्दिष्टपूर्ती होत असे. गेल्या वर्षभरातही योग्य ती काळजी घेत शस्त्रक्रिया करण्यात येत होत्या. गेल्यावर्षी कोरोना संसर्ग कमी होऊ लागल्यानंतर पुन्हा त्या सुरू करण्यात आल्या होत्या. आता मात्र, ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घेऊन अत्यावश्यक असलेल्याच शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. अत्यावश्यक कारणांसाठीच्या शस्त्रक्रिया आताही सुरूच आहेत.
डॉ. सतीश देसाई, विभागप्रमुख, नेत्रशस्त्रक्रिया विभाग.
चाैकट
जानेवारी ते मार्च २०२० कालावधीतील शस्त्रक्रिया ४०८
जानेवारी ते एप्रिल २०२१ कालावधीतील शस्त्रक्रिया ३२९