लोकमत न्यूज नेटवर्क
तासगाव : सावळज (ता. तासगाव) येथे वाढत्या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लोकसहभागातून सुरू करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षास प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवारी पाच जण कोरोनामुक्त झाल्याने आरोग्य तपासणी करून त्यांना घरी सोडण्यात आले. या पाच जणांचा गुलाब, रोप देऊन सत्कार करण्यात आला.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विलगीकरण कक्ष सावळज येथे सुरू केले आहे. कोरोना विलगीकरण कक्षात उत्तम आरोग्य सेवा देत असलेले डॉ. माणिक गंगाधरे यांचा सत्कार विलगीकरण कक्षातील व्यक्तींनी केला. तसेच नैसर्गिक ऑक्सिजन वाढावा यासाठी वृक्ष लागवड करावी याची जनजागृती करून कोरोनामुक्त व्यक्तींना झाडांची रोपे भेट देण्यात आली. या कक्षात चांगल्या सोयी- सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींनी कक्षाचे व सर्व दानशूर व्यक्तींचे आभार मानले.
यावेळी डॉ. माणिक गंगाधरे, राजू सावंत, रमेश मस्के, विश्वास निकम, संजय भोरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.