सांगली : जिल्ह्यातील आणखी ३०० गावांत कोरोनाचे लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्राजक्ता कोरे यांनी ही माहिती दिली. लसीच्या उपलब्धतेनुसार ग्रामस्थांना लस दिली जाणार आहे.
जिल्ह्यात सध्या १२ ग्रामीण रुग्णालये, तीन उपजिल्हा रुग्णालये, ६२ प्राथमिक आरोग्य केंद्रे व ३२० उपकेंद्रांमध्ये लसीकरणाची सोय आहे. त्याशिवाय महापालिका क्षेत्रातही महापालिकेच्या आरोग्य केंद्रांत लस दिली जाते. उर्वरित सुमारे ३०० गावांत आरोग्य केंद्रे नाहीत. आरोग्य सेवेसाठी तेथील ग्रामस्थांना जवळच्या गावातील आरोग्य केंद्रात जावे लागते. कोरोना लसीकरणाची सोय गावात नसल्याने ग्रामस्थ वंचित राहत आहेत, शिवाय लसीकरणाचा टक्का वाढण्यावरही प्रतिकूल परिणाम होत आहे. हे लक्षात घेऊन लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे.
या ३०० गावांत प्राथमिक शाळांमध्ये लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी नजीकच्या आरोग्य केंद्रातील कर्मचारी व अन्य सुविधा वापरल्या जातील. दोन दिवसांत ही मोहीम सुरू होईल. लस मिळेल त्यानुसार लसीकरण होईल. या माध्यमातून अधिकाधिक लोकांचे लसीकरण करण्याचा प्रयत्न असल्याचे कोरे म्हणाल्या. वृद्ध, दिव्यांग, महिलांना लसीसाठी धावपळ करावी लागणार नाही. यानिमित्ताने जिल्ह्यातील सर्वच गावांत लसीकरणाची सोय होणार आहे.