सांगली : जिल्ह्यात सध्या १११ आरोग्य केंद्रांवरून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू असून, आता आणखी ११६ ठिकाणी ते सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात २२७ केंद्रांवर सोय करण्यात आली आहे. जिल्ह्यातील आरोग्य उपकेंद्रांतही आता ही सोय करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी गुरुवारी पत्रकार बैठकीत दिली.
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असून नागरिकांनी स्वत:हून काळजी घेतल्यास संसर्ग रोखता येणार आहे. लसीकरणास अधिक गती देण्यात आली आहे. आता ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. येणाऱ्या कालावधीत कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ अपेक्षित असल्याने प्रशासनासह प्रत्येकासाठी हा कालावधी संवेदनशील असणार आहे. लसीकरणाचे दोन डोस पूर्ण झाल्यानंतर कोरोना होण्याची शक्यता अत्यल्प आहे. सर्व नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता लसीकरण करून घ्यावे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पोलीस, महापालिका प्रशासन प्रयत्नशील असले तरी आता नागरिकांनीही स्वत:हून अनावश्यक गर्दी टाळावी व नियमांचे पालन करावे. मास्क न वापरणाऱ्या व नियम मोडणाऱ्यांकडून जिल्ह्यात ४० लाख ९० हजार रुपये दंडाची वसुली करण्यात आली आहे. मात्र, कारवाई करणे, दंड वसूल करणे हे उद्दिष्ट नसून कोरोनाचा प्रसार रोखण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
चौकट
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, जिल्ह्यात ४५ वर्षांवरील सहा लाख ३० हजार नागरिक असून, या सर्वांच्या लसीकरणासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. आतापर्यंत दोन लाख ४३० कोविड लस प्राप्त झाल्या असून, यापैकी एक लाख ७३ हजार ४३० कोविशिल्ड तर २७ हजार कोव्हॅक्सिन लस आहेत. जिल्ह्यातील एक लाख ४२ हजार २१८ जणांचा पहिला डोस तर १७ हजार ९७४ जणांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे.