जत : जत तालुक्यात २५ ठिकाणी कोरोना लसीकरणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून जास्तीत जास्त लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत, अशी माहिती प्रांताधिकारी प्रशांत आवटे यांनी दिली. यावेळी तहसीलदार सचिन पाटील व जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर उपस्थित होते.
जत तालुक्यातील ८ प्राथमिक आरोग्य केंद्रे,२ ग्रामीण रुग्णालये व १५ उपकेंद्रांत लसीकरणाची सोय सुरू केली आहे. आजअखेरपर्यंत तालुक्यातील ७ हजार ५२८ नागरिकांना कोरना लसीकरणाचा पहिला डोस दिला असून ९६७ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. जत नगरपालिकेच्या वतीने लसीकरणाबाबत जनजागृतीचे काम सुरू आहे. ग्रामीण भागात ग्रामदक्षता समितीच्या वतीने सरपंच, तलाठी यांच्यावर जबाबदारी निश्चित करून कोरोना लसीसंदर्भात नागरिकांत जनजागृती करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत.