ओळी -
सांगलीच्या फळ मार्केटमध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांवर महापालिकेच्या पथकाने दंडात्मक कारवाई केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : येथील विष्णूअण्णा फळ मार्केटमध्ये शनिवारी पुन्हा कोरोना नियमांना हरताळ फासून दुकाने सुरू करण्यात आली होती. ही बाब निदर्शनास येताच महापालिकेच्या पथकाने पाच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केली. तसेच विनापरवाना वाहतूक करणाऱ्या चार वाहनांवरही कारवाई करण्यात आली. दिवसभरात पथकाकडून ८१ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
कोल्हापूर रोडवरील फळ मार्केट आवारात पहाटेच्या सुमारास काही व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू केल्याची माहिती मिळाल्यानंतर आयुक्त नितीन कापडणीस व उपायुक्त राहुल रोकडे यांच्या आदेशाने साहाय्यक आयुक्त अशोक कुंभार, एस. एस. खरात हे पथकासह त्या ठिकाणी दाखल झाले. यावेळी पाच व्यापाऱ्यांनी कोरोना नियमांचे उल्लंघन करीत दुकाने सुरू ठेवल्याचे निदर्शनास आले. या पाचही व्यापाऱ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. यावेळी विनापरवाना वाहतूक करणारी पाच वाहनेही आढळून आली. त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई करण्यात आली. शिवाय तीन जण विनामास्क फिरत होते. त्यांनाही दंड करण्यात आला. या कारवाईत महापालिकेने ७१,५०० इतका दंड वसूल केला आहे.
त्यानंतर वखार भागामधील हॉटेल आस्वादसह आणखी दोन वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. दिवसभरात ८१ हजार ५०० रुपये इतका दंड वसूल केला आहे. या कारवाईत वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे, किशोर काळे, राजू गोंधळे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.