सांगली : कोरोनाचा संसर्ग वाढत असताना पुन्हा लसीकरण केंद्रांवर झुंबड उडाली आहे. लसीकरणात सुसूत्रता नसल्याने जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. ही लसीकरण केंद्र गर्दीमुळे कोरोना प्रसार केंद्र ठरण्याची शक्यता आहे. लसीकरण आणि कोरोना चाचण्या एकाच ठिकाणी होत आहेत.
शहरांनंतर आता ग्रामीण भागात मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. सुरुवातीला लसीकरणाकडे दुर्लक्ष करणारे आता लस घेण्यासाठी आरोग्य केंद्रांबाहेर रांगा लावत आहेत. मात्र, लसीचा साठा मर्यादित असल्याने नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. लसीकरणासाठी नोंदणीचे वेळापत्रक नसल्याने नागरिकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचाही बोजवारा उडत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असताना पुन्हा लसीकरण केंद्रांवर झुंबड उडाली आहे. लसीकरणात सुसूत्रता नसल्याने बहुतांशी केंद्रांवर व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. ही लसीकरण केंद्र गर्दीमुळे कोरोना प्रसार केंद्र ठरण्याची शक्यता आहे.
कडेगाव तालुक्यातील चिंचणी, कडेगाव केंद्रांबाहेर लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. या केंद्रांवर सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनीच ऑनलाईन नोंदणी करुन गर्दी केली होती. कडेगाव केंद्रावरही हीच परिस्थिती होती. यामुळे स्थानिकांना लस मिळण्यात अडचणी येत आहेत.
जत शहरात एकच लसीकरण केंद्र असून, त्याठिकाणी नागरिकांची गर्दी होती. या केंद्रावर दोनशे व्यक्तींचीच लस आली होती. या केंद्रावरही कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यासह सांगलीतील तरुण लसीकरणासाठी आल्यामुळे स्थानिक तरुण लसीपासून वंचित राहिले. खानापूर तालुक्यातील वेजेगाव आणि खानापूर या दोन केंदांवरच लसीकरण झाले. उर्वरित केंद्रांवरील लस सकाळीच संपली होती. मिरज तालुक्यातील बुधगाव केंद्रावर लस संपली होती तर कवलापुरात नागरिकांची गर्दी होती. येथे येणाऱ्या नागरिकांना कुणीच समाधानकारक उत्तर देत नव्हते. अनेकांना लस मिळालीच नाही. पलूस तालुक्यात तीन केंद्र असून, येथील कोविशिल्ड लस संपली आहे. कोव्हॅक्सिनचे लसीकरण सुरु होते. या केंद्रावरही लसीकरणासाठी नागरिकांची रोजच गर्दी आहे.
तासगाव, कवठेमहांकाळ, आटपाडी, वाळवा, शिराळा तालुक्यातील लसीकरण केंद्रांवरील लस दुपारीच संपल्यामुळे लसीकरण संपल्याचे बोर्ड लावले होते. नागरिकांना उद्या लस येणार, असा निरोप आरोग्य कर्मचाऱ्यांकडून दिला जात होता.
चौकट
जिल्ह्यातील लसीकरण तालुका लसीकरण संख्या
वाळवा १२३६२१
आटपाडी २८५८२
जत ३९६९८
कडेगाव ३१८४१
क. महांकाळ ३४१६४
खानापूर ३१५४४
मिरज ७३०४८
पलूस ३४०५७
तासगाव ५५४२४
शिराळा ४७३४९
महापालिका क्षेत्र १२०६७९
एकूण ६२०००७
चौकट
लसीकरणात वाळवा तालुका आघाडीवर
मंगळवारपर्यंत वाळवा तालुक्यात सर्वाधिक एक लाख २३ हजार ६२१ व्यक्तींचे लसीकरण झाले आहे. महापालिका क्षेत्रापेक्षाही वाळवा तालुक्याचे लसीकरण जास्त झाले आहे. महापालिका क्षेत्रात एक लाख २० हजार ६७९ व्यक्तींचे लसीकरण झाले आहे. सर्वात कमी २८ हजार ५८२ व्यक्तींचे लसीकरण आटपाडी तालुक्यात झाले आहे.