लोकमत न्युज नेटवर्क
बुधगाव : कोरोनानंतरच्या म्युकरमायकोसिसने आयुष्याचा खरा अर्थ शिकविला! क्षणाक्षणाला मृत्यू समोर दिसत होता. पण न घाबरता सकारात्मक विचार करीत, त्यावर मात केली. डाॅक्टर बनून आलेल्या देवदूतांनी मला जीवन दिले. उर्वरित आयुष्य जास्तीत जास्त सत्कारणी लागेल असेच जगण्याचा संकल्प केला आहे' अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे निदान झालेल्या आणि बरे होऊन घरी परतलेल्या पहिल्या रुग्णाने.
व्यवसायाने रिक्षाचालक असलेला हा रुग्ण कोरोना साथीच्या सुरुवातीपासूनच कोरोना बाधितांना रुग्णालयात नेण्या-आणण्याचे काम करीत होता. १९ एप्रिलला त्यालाही कोरोनाची लागण झाली. मिरज शासकीय रुग्णालयात उपचार घेऊन तो २ मे ला घरी आला. ५ मे ला त्याला अर्धशिशीचा त्रास सुरू झाला. ६ तारखेला गावातील डाॅक्टरांना म्युकरची शंका आल्याने, पुढील उपचारांसाठी मिरजेला जाण्याचा सल्ला दिला.
तो सांगत होता की ७ तारखेपासून चेहऱ्याची निम्मी बाजू सुजू लागली. तोंड उघडणे शक्य होईना. ८ मे ला मिरज शासकीय रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तपासण्यांनी म्युकरमायकोसिसचेच निदान झाले. तसा मी पहिलाच रुग्ण असल्याने, वेगळा कक्ष नव्हता. पुन्हा कोरोना अतिदक्षता कक्षातच उपचार सुरू झाले. पहिली दोन इंजेक्शन्स मिरजेतच मिळाली. त्यानंतर वेदना तर थांबल्या. म्युकरची मेंदूच्या भागात वाढ सुरू असल्याचे लक्षात आल्याने, आणखी इंजेक्शन्स आवश्यक होती. यावेळी माझ्या भावाची फारच तारांबळ झाली. ती गोव्यातून आणली. पुढे म्युकरमायकोसिस रुग्णांसाठी तयार झालेल्या वेगळ्या कक्षात मला हलविले. मी तिथे असेपर्यंत पुढे ३२ रुग्ण झाले. माझ्यावर आवश्यकतेनुसार तीन शस्त्रक्रिया झाल्या. १० जूनला शेवटची शस्त्रक्रिया झाली. १६ जूनला म्युकरमायकोसिसमुक्त होऊन मी घरी आलो. तो जीवन जगण्याच्या सारांशाची शिदोरी घेऊनच! रुग्णालयातील ४० दिवसांचा काळ तसा कर्दनकाळच! पण उपचार करणारे डाॅ. सुजित शिवशरण, डॅा. योगेश कछवे यांच्यासह सर्वच डाॅक्टर्स माझ्यासाठी देवदूत ठरले.
चौकट
शवांच्या गराड्यातही जेवलो
कोरोना कक्षात उपचार सुरू असताना बाजूचे वातावरण पाहून जेवण्याची इच्छाच होत नसे. मात्र डाॅक्टरांनी समजावून सांगितल्यानंतर बाजूला असलेल्या शवांच्या गराड्यातच खाटेवर बसूनच जेवलो! कारण मला जगायचे होते, असे त्याने सांगितले.