सांगली : महापालिका मुख्यालयात अखेर कोरोनाचा शिरकाव झाला आहे. नगरसचिव विभागातील एका कर्मचाऱ्याचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने मुख्यालयात खळबळ उडाली. आरोग्य विभागाकडून मुख्यालयातील सर्वच कार्यालयांत औषध फवारणी करण्यात आली. त्यामुळे सोमवारी पालिकेत फारशी वर्दळ नव्हती.
महापालिका क्षेत्रात कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. त्यात आता मुख्यालयातील कर्मचारीही कोरोनाबाधित झाला. नगरसचिव कार्यालयातील हा कर्मचारी गेल्या तीन ते चार दिवसांपासून पालिकेत आला नव्हता. त्याचा अहवाल सोमवारी पाॅझिटिव्ह आला. याची माहिती मिळताच मुख्यालयातील महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेते, सभागृह नेते, राष्ट्रवादीचे गटनेते, प्रभाग समिती एकसह सर्वच कार्यालयांत औषध फवारणी करण्यात आली.
नगरसचिव विभाग सील करण्यात आला आहे. या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही होम आयसोलेशनची सूचना केली आहे. दरम्यान, मुख्यालयात कोरोनाबाधित सापडल्याने खळबळ उडाली होती. त्यामुळे पदाधिकाऱ्यांसह अधिकारी व नागरिकांची वर्दळही कमी झाली होती. प्रशासनाकडून प्रवेशद्वारावर मास्क व सॅनिटायझरची सक्ती करण्यात येत होती. सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांनीही बऱ्याच सूचनानंतर आता मास्कही परिधान केला होता.