मिरजेतील पाटील कुटुंबासोबत उभा डॉ. जय शहा
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनाने रक्ताच्या नात्यांना माणसे दुरावली, तशीच जवळदेखील आली. मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षात शिकणारा मुंबईच्या दहिसरमधील जय विपुल शहा याला कोरोनाने मिरजेत नवा परिवार मिळवून दिला. सख्ख्या नातेवाइकांप्रमाणेच तो या परिवारात एकरूप होऊन गेला आहे.
गेल्यावर्षी लॉकडाऊन काळात सर्व हॉटेल्स, खानावळी बंद झाल्यावर जयच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला होता. अशावेळी सन्मित्र कॉलनीतील अजय पाटील यांनी घरच्यासारखा आधार दिला. सध्या दुसऱ्या लाटेतही लॉकडाऊनमध्ये या परिवाराच्या पाठिंब्यावरच त्याची कोविड रुग्णालयात रुग्णसेवा सुरू आहे. गतवर्षी २२ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर झाले. जयचे मुंबईचे तिकीट २१ मार्चचे होते; पण या घोषणेनंतर सर्व गाड्या, रेल्वे बंद झाल्या. महालक्ष्मी एक्स्प्रेसही कॅन्सल झाली. त्यामुळे तो मिरजेत अडकून पडला. खानावळ बंद झाल्याने मॅगीचे पुडे, बिस्किटे आणि रेडिमेड पदार्थांचा साठा केला. दुपारी कॉलेज कॅन्टीनमध्ये आणि रात्री खोलीवर काहीतरी शिजवून खाऊन गुजराण केली. स्वतः थोडाफार स्वयंपाकही केला. कधीकधी सलग तीनचार दिवस मॅगी खाऊन दिवस काढले. घरमालक अमेरिकेला गेले होते. सहा महिने परतणार नसल्याने त्यांच्याकडे जेवणाचा मार्गही खुंटला होता. रुग्णसंख्या वाढल्याने अखेर कॅन्टीनचे दुपारचे जेवणही बंद झाले.
शेजारीच राहणाऱ्या अजय पाटील यांना याची माहिती मिळाली. शेजारधर्म म्हणून त्यांनी एकदा जेवायला बोलावलं. पहिल्याच पंक्तीत जय आणि पाटील कुटुंबाच्या कुंडल्या जुळल्या. पाटील परिवारात अजय, पत्नी अंजली, भाऊ अमित, भावजय सविता आणि आई सुरेखा असे सदस्य. जय काही दिवसांतच या कुटुंबाचा सदस्य बनला.
चौकट
दोन वर्षांत एकदाही संवाद नव्हता अन्...
लॉकडाऊनच्या न संपणाऱ्या कंटाळवाण्या प्रदीर्घ काळात जयसाठी पाटील कुटुंबीयच रक्ताचे नातेवाईक बनून गेले. जयच्या घरच्यांना त्याच्याविषयी चिंता लागून राहिली होती; पण पाटील कुटुंबासोबत संवादानंतर तेदेखील निर्धास्त झाले. गेल्या वर्षभरापासून जयसाठी पाटील कुटुंबीयच पालकासमान ठरले. विद्यार्थिदशेतच जयने नाती कशी सांभाळायची याची शिकवण मिळविली. शेजारच्याच फ्लॅटमध्ये राहूनही दोन वर्षांत एकदाही त्याचा पाटील कुटुंबाशी संपर्क आलेला नव्हता; पण कोरोनाने अवघ्या चार-सहा महिन्यांतच माणुसकीचे नवे नाते जोडून दिले.