कुपवाड : केंद्र शासनाने कोरोना आजाराचा ईएसआय योजनेत समावेश केला आहे. नोंदणीकृत कामगार व त्यांच्या वारसांसाठी ही योजना जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ईएसआयच्या नोंदणीकृत कामगारांनी व त्यांच्या वारसांनी तत्काळ अर्ज करावेत, असे आवाहन सांगली, मिरज एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष संजय आराणके यांनी केले आहे.
कोरोना आजाराचा ईएसआय योजनेत समावेश केला आहे. त्यामुळे कोरोनावर उपचार घेणाऱ्या कामगारांचा खर्च ईएसआय करणार आहे. आजारपणाच्या काळातील पगाराच्या ७० टक्के रक्कम सानुग्रह अनुदान म्हणून देण्यात येणार आहे. या रोगामुळे मृत्यू पावलेल्या कामगारांच्या वारसांना आर्थिक मदत व पेन्शनचा लाभ तत्काळ देण्यात येणार आहे. नोंदणीकृत कामगारांच्या पत्नीला प्रतिवर्ष केवळ १२० रुपये इतक्या अल्प दरात ईएसआयच्या रुग्णालयात मोफत औषधोपचार करण्यात येणार असून अन्य योजनाही जाहीर केल्या आहेत.
त्यामुळे ही योजना पूर्वलक्षी प्रभावाने २४ मार्च २०२० पासून पुढील दोन वर्षांसाठी लागू करण्यात आली आहे. या कालावधीत कोरोना आजारातून बरे झालेल्या कामगारांना व मृत्यू पावलेल्या कामगारांच्या वारसांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ही प्रकरणे येत्या १५ दिवसांत निकाली काढण्यात येणार आहेत. त्यामुळे ईएसआय नोंदणीकृत कामगारांनी आणि त्यांच्या वारसांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी तत्काळ नजीकच्या ईएसआय कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष संजय आराणके यांनी केले आहे.