सांगली : कोरोनामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. घरातील कर्ता पुरूषही कोरोनाने हिरावून घेतला आहे. अशा कुटुंबातील विधवा महिलांवर संसाराचा गाडा हाकण्याची मोठी जबाबदारी आली आहे. या विधवा महिलांना संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी पेन्शन योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना अशा विविध शासकीय योजनांतून आर्थिक मदत मिळू शकते. पण या योजनांसाठी असलेले निकष अनेक महिलांसाठी अडचणीचे ठरणारे आहेत. त्यामुळे शेकडो महिला शासकीय लाभापासून वंचित राहण्याची भीतीही आहे.
जिल्ह्यात कोरोनामुळे साडेतीन हजारहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची महामारी सुरू झाल्यापासून केवळ आर्थिक आघाडीवर नव्हे तर कौटुंबिक पातळीवरही अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक महिलांच्या कपाळावरील कुंकूही हिरावून घेतले आहे. या निराधार महिलांना खऱ्या अर्थाने आधाराची गरज आहे. त्यासाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी पेन्शन योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना अशा विविध शासकीय योजनांतून विधवा महिलांना पेन्शन मिळू शकते. एक हजारापासून बाराशे रुपयांपर्यंत ही पेन्शन आहे. तर कुटुंब लाभ योजनेतून २० हजार रुपये एकरकमी मिळतात. हे लाभ या महिलांना मिळवून देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने पुढाकार घेण्याची गरज आहे. पण या योजनेसाठी शासकीय निकषांमुळे त्या लाभापासून या महिला वंचित राहू शकतात. आधीच कोरोनामुळे दु:खाचा डोंगर कोसळलेल्या या विधवा महिलांना मदतीचा हात देताना निकष, नियमांचे अडथळे दूर करण्याची गरज आहे.
चौकट
कोरोनाने १५० महिलांना केले निराधार
१. कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांची संख्या तशी हजारात आहे. वर्षभरात कोरोनामुळे किती महिला विधवा झाल्या, याची आकडेवारी प्रशासनाकडे नाही. मृतांची संख्या पाहता दीड हजारांच्या आसपास पुरूषांचा मृत्यू झाला आहे.
२. सध्या निराधार मुलांचे सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षणात वडिलांचा मृत्यू झाल्याची नोंद घेतली जात आहे. या नोंदीतून आतापर्यंत १५० महिलांचे पती कोरोनाचे बळी ठरल्याची बाब समोर आली आहे.
३. यापैकी ५३ महिलांचा संजय गांधी योजनेसह विविध योजनांचा लाभ देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यांच्याकडून नवीन अर्ज भरून न घेता सर्वेक्षणातील कागदपत्रांच्या आधारावर योजनेचा लाभ देण्याची शिफारस करण्यात आली आहे.
चौकट
असा करा अर्ज
संजय गांधी योजनेसह विविध योजनांसाठी संबंधितांना महासेवा केंद्रात ऑनलाईन अर्ज करावा लागेल. २१ हजारांच्या उत्पन्नाचा दाखला, पतीच्या मृत्यूचा दाखला, आधारकार्ड, स्वयंघोषणापत्र व इतर कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावी लागतील. तसेच महासेवा केंद्राकडील टोकन व कागदपत्रांची हार्डकाॅपी तहसील कार्यालय किंवा अर्ज करावयाच्या संबंधित कार्यालयात जमा करावी लागतील.
चौकट
कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळू शकतो. सध्या बालविकास विभागाकडून पालक हिरावलेल्या मुलांचे सर्वेक्षण सुरू आहे. त्यातून ५३ विधवा महिलांना मदतीची गरज दिसून आली. त्यांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला आहे. अजून सर्वेक्षण सुरू असून, पात्र विधवा महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
- सुवर्णा पवार, जिल्हा महिला बालविकास अधिकारी
चौकट
जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण रुग्ण -
बरे झालेल्या रुग्णांची संख्या -
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण -
महिला रुग्ण -