लोकमत न्यूज नेटवर्क
जत : जत शहरासह तालुक्याच्या प्रमुख गावांतील अत्यावश्यक सेवा वगळता इतर दैनंदिन व्यवहार बंद आहेत. परंतु, काही नागरिक रस्त्यावर गर्दी करत असल्यामुळे त्याचा त्रास इतर नागरिकांना होऊ लागला आहे. लॉकडाऊनमुळे व्यापारी कर्जबाजारी होणार आहेत, अशी भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
जिल्हा प्रशासनाने मंगळवारी रात्री लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर बुधवारपासून लाॅकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मंगळवारी रात्री पोलिसांनी जत शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याची सूचना केली होती. दूध, पालेभाज्या, फळे, वैद्यकीय सेवा, बेकरी, किराणा दुकाने आदी अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. त्यानिमित्त खरेदी-विक्री करण्यासाठी काही भागांत नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. मुख्य बाजार असलेल्या मंगळवार बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत आहे. दैनंदिन व्यवहार बंद असले तरी काही नागरिक दुचाकी व चारचाकी वाहन घेऊन रस्त्यावरून फिरत असल्यामुळे मुख्य बाजारपेठ वगळता इतर ठिकाणी नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेले रुग्ण व होम क्वारंटाईन झालेले काही नागरिक प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता शासकीय नियम पायदळी तुडवून गावातून फेरफटका मारत आहेत. काहीजण परगावी जात आहेत. त्यांच्या बेजबाबदार वागण्यामुळे कोरोनाचा धोका वाढत आहे. प्रशासनाने अशा नागरिकांचा बंदोबस्त करून संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
चौकट
लाॅकडाऊन जाहीर होण्यापूर्वी दोन दिवस अगोदर व्यापारी व व्यावसायिकांना पूर्वकल्पना देण्यात येईल. त्यानंतर लॉकडाऊन जाहीर करण्यात येईल, अशी घोषणा राज्य शासनाने केली होती; परंतु तशी कोणतीही पूर्वसूचना न देता लॉकडाऊन जाहीर केले आहे. शासनाने घेतलेला निर्णय पाठीमागे घ्यावा.
-मंजुनाथ मोगली, प्रतिनिधी, जत तालुका व्यापारी असोसिएशन.
चौकट
२०२० मधील लॉकडाऊन संपून व्यापार पूर्वपदावर येत असतानाच शासनाने परत दुसऱ्यांदा लॉकडाऊन सुरू केले आहे. त्यामुळे संपूर्ण व्यवसाय आणि व्यापार मोडकळीस येणार आहे. शासनाने नागरिकावर कडक निर्बंध लावावेत. शहरातील छोटे-मोठे व्यवसाय चालू ठेवले पाहिजेत.
-किरण बिज्जरगी, अध्यक्ष, जत तालुका व्यापारी असोसिएशन.