सांगली : शहरातील कोरोना रुग्णांच्या घरचे वीज कनेक्शन बुधवारी तोडण्यात आले. थकबाकी भरल्याशिवाय कनेक्शन जोडण्यास नकार दिला गेला. घरात एक व्यक्ती ऑक्सिजनवर होती. अखेर नागरिकांनी बाजूच्या घरातून वीज घेऊन ऑक्सिजन यंत्र सुरू ठेवले. अखेर थकबाकीपोटी धनादेश घेतल्यानंतरच कनेक्शन जोडण्यात आले. या प्रकारामुळे नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे.
कोल्हापूर रोडवरील एका प्लाॅटमधील कुटुंब कोरोनाबाधित आहे. कुटुंबातील एकाला ऑक्सिजनही लावण्यात आला आहे. बुधवारी दुपारी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घराचा विद्युत पुरवठा खंडित केला. या कुटुंबाची लाॅकडाऊनच्या काळापासून थकबाकी होती. तसे कुटुंबाची आर्थिक स्थितीही बेताचीच. गॅरेज चालवून त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह सुरू होता. लाॅकडाऊनमुळे गॅरेज बंद होते. आता पंधरा दिवसांपासून गॅरेज सुरू झाले होते. त्यामुळे वीजबिल भरण्यात अडचणी आल्या.
विद्युत पुरवठा अचानक खंडित झाल्याने त्यांची पळापळ झाली. सामाजिक कार्यकर्ते आयुब पटेल हे त्यांच्या मदतीला धावले. त्यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना विनवण्या केल्या. थकबाकीपोटी थोडी रक्कम भरण्याची तयारीही दर्शविली; पण अखेरपर्यंत कर्मचाऱ्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. अखेर थकबाकीपोटी धनादेश दिल्यानंतरच या घराचा विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात आला. घरात ऑक्सिजनवर कोरोना रुग्ण असताना थोडीफार माणसुकी कर्मचाऱ्यांनी दाखविणे अपेक्षित होते, अशीच प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे.