दुधगाव : नक्षलवाद्यांशी कडवी झुंज देणारे वाळवा तालुक्यातील बोरगाव येथील सहायक पोलीस निरीक्षक रोहित फारणे यांच्या कुटुंबीयांना मात्र कोरोनाने हरवले. अवघ्या सतरा दिवसांत त्यांचे आई-वडील व आजोबा कोरोनाने मृत्युमुखी पडले.
रोहित यांनी विद्यार्थीदशेत असल्यापासून कुस्ती करत शैक्षणिक करिअर केले. ‘जिंकलो तर तिरंगा फडकवू, शहीद झालो, तर तिरंग्यात लपेटून येणार’ या जिद्दीने ते गडचिरोली येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू झाले. त्यांनी नक्षलवाद्यांचे आव्हान स्वीकारले. युद्धसदृश परिस्थितीत नक्षलवाद्यांना कंठस्नानदेखील घातले.
नक्षलवादी अभियाविरोधी पथकात तीन वर्षे उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना डिसेंबर २०२० मध्ये विशेष सेवा पदक मिळाले. या शौर्याबद्दल त्यांना पोलीस निरीक्षक म्हणून बढती मिळाली. एक मे २०२१ च्या पोलीस महासंचालकांच्या पदकाचे ते मानकरी ठरले.
या सगळ्या लढाया जिंकणाऱ्या ध्येयवादी युवकाच्या कुटुंबाला कोरोनाने हिरावून घेतले आहे. त्यांच्या कुटुंबावर कोरोनाने जबरदस्त हल्ला केला आहे. आई-वडील व आजोबांचा मृत्यू झाला. घरी वृद्ध आजी एकट्या असतात.
चौकट
रोहितचे वडील रमेश फारणे हे राजारामबापू साखर कारखान्यात फिल्डमन म्हणून कार्यरत होते. ते ३० जूनला सेवानिवृत होणार होते. निवृत्तीनंतर पत्नी, आई-वडिलांसोबत आनंदात राहायचे, असे त्यांचे स्वप्न कदाचित नियतीला मान्य नव्हते. २२ एप्रिलला वडिलांचे निधन आणि दुसऱ्यादिवशी पत्नीचे निधन झाले, तर काही दिवसात रमेश फारणे यांचे निधन झाले. कोरोनाने एक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे.