लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : शिराळा एमआयडीसीमधील दोन कंपन्यांचे दूषित, दुर्गंधीयुक्त सांडपाणी ओढ्यात सोडण्यात येत आहे. प्रत्यक्ष पाहणी करून हे पाणी बंद करावे, अशा आशयाचे निवेदन भटवाडीचे सरपंच विजय महाडिक यांनी तहसीलदार गणेश शिंदे यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, एमआयडीसीमधील कॅलर्स बायो एनर्जी आणि श्रीराम पेपर मिल या दोन कंपन्यांमधून येणारे दूषित सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेशिवाय सरळ ओढ्यात सोडले जात आहे. त्याचा रंग पूर्ण काळा असून त्याला दुर्गंधी आहे. पावसाळा सुरू झाला की, गेली दोन वर्षे या कंपन्या दूषित दुर्गंधीयुक्त सांडपाणी ओढ्यात सोडत आहेत. ते ओढ्यातून मोरणा नदीत जात आहे. खेड ग्रामपंचायतीने याचा बंदोबस्त करावा, असा अर्ज केला आहे. हे सलग तीन वर्षे चालू आहे. प्रदूषण महामंडळसुद्धा याबाबत दखल घेत नाही. स्थळ पाहणी करून कारवाई व्हावी, अशी मागणी येथील शेतकऱ्यांची आहे. गेल्या दोन वर्षांत अनेक जनावरे दगावली आहेत.