सांगली : महापालिकेतील सत्ताबदलाचे कारस्थान खपवून घेणार नाही. त्याबाबतचा पाठपुरावा सुरू आहे. कारवाई निश्चितपणे होईल, अशी माहिती भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर यांनी मंगळवारी भाजप नगरसेवकांच्या बैठकीत दिली.
येथील खरे सांस्कृतिक सभागृहात भाजप नगरसेवकांची बैठक पार पडली. काही सदस्य ऑनलाईन सहभागी झाले होते. दीपक शिंदे व भाजपचे महापालिकेतील नेते शेखर इनामदार यांनी नगरसेवकांना मार्गदर्शन केले. यावेळी शिंदे म्हणाले की, महापालिकेत भाजपविरोधात कटकारस्थान करताना कायद्याची पायमल्ली करण्यात आली आहे. त्यामुळे हे प्रकरण आम्ही तडीस नेऊ. राज्य शासनाकडून दखल घेतली नाही, तर न्यायालयाकडून न्याय मिळू शकतो, पण हे कारस्थान आम्ही खपवून घेणार नाही. सध्या महापालिकेचा कारभार अत्यंत वादात सापडला आहे. नागरिकांमध्ये या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी नगरसेवकांनी तत्पर राहावे.
शेखर इनामदार म्हणाले की, महापालिका क्षेत्रातील सर्व भाजप व घटकपक्षांच्या नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागातील प्रलंबित कामांबाबत, आवश्यक गोष्टींबद्दलची यादी तयार करावी. महापालिका स्तरावर तसेच शासनस्तरावर त्याचा पाठपुरावा करू. नगरसेवकांनी कोणत्याही परिस्थिती एकसंधपणे काम करावे. आपसांत मतभिन्नता न ठेवता तसेच न खचता लढायचे आहे.
अपेक्स प्रकरणातही भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करून याप्रकरणी कारवाई करण्यास भाग पाडले आहे. महापालिकेचा कारभारही यामुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्यामुळे याप्रकरणातही भाजप जनतेच्या बाजूने राहणार आहे. कोणत्याही परिस्थितीत हे प्रकरण तडीस नेऊन अन्याय झालेल्या लोकांना न्याय मिळवून देऊ, असा निर्धार नेत्यांनी व्यक्त केला.
चौकट
प्रशासनाबद्दल तक्रारींचा पाऊस
महापालिका प्रशासन व आयुक्तांकडून भाजप नगरसेवकांना म्हणावे तसे सहकार्य होत नाही. विकासकामांमध्ये राजकारण केले जात आहे, अशा तक्रारी नगरसेवकांनी यावेळी केल्या. त्यावर दीपक शिंदे म्हणाले की, आयुक्त नितीन कापडणीस यांच्याबरोबर भाजप नगरसेवकांची एक बैठक घेऊन त्यांच्यासमोर बसून हे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करू.