सांगली : अध्यात्माच्या माध्यमातून प्रबोधन करीत सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या रेवदंडा (ता. अलिबाग) येथील नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने रविवारी कृष्णा नदी परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सकाळी ७ ते ११ या अवघ्या चार तासात एक किलोमीटर परिसरात स्वच्छता करीत तब्बल ९३ टन कचरा संकलित करण्यात आला. कोणत्याही शासकीय यंत्रणेला जे जमले नाही, ते केवळ एका दिवसात करुन दाखवत स्वच्छतेचा नवा आदर्श प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी नागरिकांसमोर ठेवला. सकाळी सहापासूनच सरकारी आणि समर्थ घाट परिसरात स्वयंसेवक जमण्यास प्रारंभ झाला होता. यामध्ये महाविद्यालयीन युवकांपासून साठ वर्षापर्यंतच्या वृध्दांचा समावेश होता. प्रत्येकाच्या हातात खराटा, फावडे किंवा स्वच्छतेचे कोणते ना कोणते साधन होते. जिल्ह्यातील विविध भागातून स्वयंसेवक घाटावर एकत्र झाले होते. काही वेळातच सर्वांनीच वेळ न दवडता स्वच्छता करण्यास सुरुवात केली. युवकांनी नदीपात्रात उतरुन ओला कचरा गोळा केला. गणेशोत्सवानंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी एक दिवस स्वच्छता अभियान राबविले होते. त्यावेळी केवळ विसर्जन न झालेल्या गणेशमूर्तींचे इतरत्र विसर्जन करण्यात आले होते. परिणामी नदीपात्रात अस्वच्छतेचे साम्राज्य कायम होते. रविवारी मात्र नदीपात्रातील प्रचंड कचरा स्वयंसेवकांनी फावड्याच्या साहाय्याने बाहेर काढून पात्र स्वच्छ केले. महापालिकेने हा कचरा उचलण्यासाठी वाहनांची सोय केली होती. महापालिकेचे २४ कर्मचारीही यात कार्यरत होते. प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने कचरा संकलित करुन तो कंटेनरमध्ये टाकला. सलग चार तास सुरु असलेल्या या मोहिमेत कोणत्याही स्वयंसेवकाने विश्रांती घेतली नाही. स्वच्छतेचे ध्येय साध्य झाल्यावरच त्यांनी विश्रांती घेतली. यावेळी नदी परिसरात आलेल्या नागरिकांचेही स्वयंसेवकांनी प्रबोधन केले. स्वयंसेवकांच्या हातात ‘प्लॅस्टिक हटवा पर्यावरण वाचवा’, ‘ स्वच्छता असे ज्याच्याघरी आरोग्य तेथे वास करी’ आदी संदेश लिहिलेले फलक होते. स्वयंसेवकांची कामाप्रतीची आस आणि त्यांनी स्वच्छतेचा संदेश देत मोहीम राबविल्याने, या मोहिमेचे नागरिकांनी स्वागत केले. (प्रतिनिधी)अविश्रांत स्वच्छता प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने कचरा संकलित करुन तो कंटेनरमध्ये टाकला. सलग चार तास सुरु असलेल्या या मोहिमेत कोणत्याही स्वयंसेवकाने विश्रांती घेतली नाही. स्वच्छतेचे ध्येय साध्य झाल्यावरच त्यांनी विश्रांती घेतली. एका दिवसात स्वयंसेवकांनी स्वच्छता मोहीम राबविली. यासाठी पालिका कर्मचाऱ्यांनीही सहकार्य केले.
स्वच्छता मोहिमेत ९३ टन कचरा संकलित
By admin | Updated: December 21, 2015 00:49 IST