(छाया : सुरेंद्र दुपटे)
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिकेच्या समाजकल्याण विभागाकडील निधीच्या गैरवापर थांबबावा, यासह विविध मागण्यासाठी शहर काँग्रेसच्या वतीने सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले.
शहर काँग्रेसच्या मागासवर्गीय विभागाचे अध्यक्ष विजय आवळे, उपाध्यक्ष सिद्धार्थ कुदळे, शुभम बनसोडे, नागेश संकपाळ, अक्षय दोडमणी, श्रीकांत साठे, अंकुश माने यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
यात म्हटले आहे की, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांची ५० टक्के लोकसंख्या असलेल्या वस्तीमध्ये नागरी सुविधांसाठी १०० टक्के निधी दिला जातो. पण गेल्या वर्षी या निधीतून इतर ठिकाणी कामे करण्यात आली. या कामाची खात्री केल्याशिवाय वर्कऑर्डर देऊ नये. मातंग समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण हटवून संरक्षक भिंत बांधावी, सिद्धार्थ परिसर व रोहिदास नगर येथील ड्रेनज व रस्त्यांची दुरुस्ती करावी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे सुशोभिकरण करावे, भोईराज सोसायटी येथील सभागृह बांधण्यास निधी द्यावा, आदी मागण्या करण्यात आल्या.