सांगली : यावर्षी श्रावक चातुर्मास दि. १७ जुलै तर मुनींचा चातुर्मास दि. २३ जुलैपासून सुरू होत आहे. हा कालावधी धर्मसाधनेसाठी उपयुक्त असतो. हा ज्ञान साधनेचा आणि उपासनेचा कालखंड असतो. या कालावधीत विविध पूजा विधींसह कार्यक्रम होतात. यावर्षी कोरोना असल्यामुळे शासकीय नियमांचे पालन करुनच कार्यक्रम करावेत, असे आवाहन दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी केले आहे.
ते म्हणाले की, कोरोनाचा धोका टळलेला नाही. त्यामुळे सर्व श्रावक-श्राविकांनी चातुर्मास, व्रतवैकल्ये काळजीपूर्वक करावीत. मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, सुरक्षित अंतर ठेवावे. विनाकारण गर्दी व प्रवास करू नये. कोरोनाविषयक नियमांचे पालन करून आत्मसाधना करताना आरोग्यही सांभाळावे.
चौकट
मंदिरे बंद, घरीच पूजन करा
महाराष्ट्रात मंदिरे बंद असल्यामुळे घरीच देवपूजन, स्वाध्याय, जप-ध्यान, उपवास या माध्यमातून चातुर्मास करावा. चातुर्मासातील सर्व क्रियांचे पालन नियमांच्या अधिन राहून, शासकीय यंत्रणा, मंदिर समिती व स्थानिक पंडित यांच्या मार्गदर्शनानुसार विधीवत करावे, असे आवाहन रावसाहेब पाटील यांनी केले आहे.