सांगली : घनकचरा व्यवस्थापनासाठी दहा कोटींच्या वाहन खरेदीला शुक्रवारी स्थायी समिती सभेत सशर्त मंजुरी देण्यात आली. वाहन खरेदीपूर्वी नगरसेवकांच्या पाच सदस्यीय समितीकडून पाहणी करून त्यांच्या अहवालानंतरच रिक्षा घंटागाडी वगळता इतर वाहनांच्या खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
स्थायी समितीच्या सभेसमोर दहा कोटी रुपयांच्या वाहन खरेदीचा विषय होता. यात ७ काॅम्पॅक्टर, सात लोडर, चार सक्शन व्हॅन, सात डम्पर प्लेसर, दोन जेटिंग मशीन व ४८ रिक्षा घंटागाडींचा समावेश आहे. महासभेने केलेल्या ठरावाविरुद्ध ही खरेदी असल्याने त्याला विरोध होण्याची शक्यता होती. सभेत वाहन खरेदीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर काही काळासाठी स्थायी समितीची सभा तहकूब करण्यात आली. पुन्हा सायंकाळी चारच्या सुमारास सभा सुरू झाली.
यावेळी ४८ रिक्षा घंटागाडी खरेदीला सदस्यांनी मंजुरी दिली. काॅम्पॅक्टरमध्ये मूळ अंदाजपत्रकापेक्षा १ कोटी कमी दराने सात वाहनांची खरेदी होणार आहे. सक्शन व्हॅनमध्ये एक कोटी २४ लाख रुपये कमी दराची निविदा आली आहे. डम्पर प्लेसर, सक्सन व्हॅनसाठी कमी दराच्या निविदा आल्या आहेत. त्यामुळे या वाहनांच्या दर्जाबाबत सदस्यांनी शंका उपस्थित केली. सभापती पांडुरंग कोरे यांनी वाहनांची प्रत्यक्ष पाहणी करून निर्णय घेण्याची भूमिका घेतली. त्यासाठी नगरसेवक गजानन मगदूम, सविता मदने, मंगेश चव्हाण, शेडजी मोहिते, प्रकाश मुळके या पाच सदस्यांची समिती नियुक्त करण्यात आली. प्रशासनातील अधिकाऱ्यासमवेत ही समिती प्रत्यक्ष वाहनांची तपासणी करणार आहे. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर वाहन खरेदीला मंजुरी दिली जाणार असल्याचे कोरे यांनी स्पष्ट केले.
चौकट
एलईडीवर चर्चा
एलईडी प्रकल्पावर सभेत चर्चा झाली. गजानन मगदूम यांनी प्रकल्पाबाबत शंका उपस्थित केली. गेली तीन वर्षे शहर अंधारात आहे. या प्रकल्पाचा नागरिकांना फायदा व्हावा, अन्यथा पुन्हा नागरिकांना अंधारात ढकलू नये, अशी भूमिका घेतली. विस्तारित भागात सर्व्हे करून नवीन पोल उभारण्याची मागणीही त्यांनी केली.