शिरशी : एरव्ही एखाद्या घटनेसंदर्भात पोलिसांना माहिती देण्यासाठी दूरध्वनी करावा आणि तात्काळ पोलीस हजर व्हावेत, ही आता दुर्मीळ बाब होत चालली आहे. मात्र आज करमाळे (ता. शिराळा) येथे दारुच्या व्यसनाच्या आहारी जाऊन मनोरुग्ण झालेल्या बहाद्दराने गावात दरोडा पडून खून झाल्याची माहिती पोलिसांना देताच, शिराळा पोलिसांचा फौजफाटा तासाभरात पोहोचला. पोलिसांच्या अचानकपणे झालेल्या या आगमनामुळे ग्रामस्थ मात्र भांबावून गेले होते.याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, हणमंत येळवे (रा. भैरववाडी, ता. शिराळा) हा तरुण कामानिमित्त मुंबईमध्ये असतो. त्याला दारुचे व्यसन असल्याने या पती-पत्नीमध्ये भांडणे होत होती. गेल्या आठवड्यात असेच भांडण करुन तो मेहुण्याच्या भीतीने गावी आला होता. गावाकडे आल्यानंतरही सतत दारू पिऊन तर्र आणि पोटात अन्न नाही, त्यामुळे तो मनोरुग्ण बनला. सोमवारी तो करमाळे येथील नातेवाईकांकडे आला होता. मात्र पहाटे उठून तो एकटाच बाहेर पडला व त्याने औंढी येथे जाऊन, ‘करमाळ्यात दरोडा पडला आहे, तसेच एकाचा खून झाला आहे’, अशी अफवा पसरवली. हे ऐकून एका अज्ञाताने शिराळा पोलीस ठाण्यात दूरध्वनी केला. खडबडून जागे झालेल्या पोलिसांनी तात्काळ गाडी बाहेर काढली. तासाभरातच करमाळे गाठले. परंतु पोलिसांनी माहिती घेतल्यावर ही अफवा असल्याचे लक्षात आहे. शेवटी नातेवाईकांच्या जबाबदारीवर त्याला ताकीद देऊन प्रकरणावर पडदा टाकला आणि पोलीस निघून गेले. (वार्ताहर)खऱ्याची पंचाईत खोट्या तक्रारी पोलिसांत येण्याच्या घटना अनेक वर्षापासून सुरू आहेत. पोलिसांच्या शंभर क्रमांकावर यापूर्वी अनेकदा असे प्रकार घडले आहेत. त्यामुळे पोलीस चक्रावून जातात. वास्तविक करमाळे येथील या घटनेत पोलिसांनी त्या तळीरामाला ताकीद दिली असली तरी, अशा घटनांमुळे कुणी खरी तक्रार दिली तर त्याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष होण्याचे प्रकार घडू शकतात.
तळीरामाची नशा अन् पोलिसांची झाली दशा
By admin | Updated: November 25, 2014 23:49 IST