तासगाव : इंच न् इंच जागेसाठी वादाच्या रक्तरंजित कहाण्या लिहल्या जात असतानाच, तासगाव तालुक्यातील तुरची येथील शेतकऱ्यांनी सामंजस्याची नवी कहाणी लिहून लोकांसमोर आदर्श निर्माण केला आहे. तालुक्यातील अनेक गावांत शेतकऱ्यांना स्वत:च्या शेतात जाण्यासाठी रस्ते नाहीत. काही ठिकाणी रस्त्यांसाठी एकमेकांवर दावे दाखल आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी तहसीलदार सुधाकर भोसले यांनी महाराजस्व अभियानांतर्गत मोहीम सुरु केली आणि तुरचीतील शेतकऱ्यांनी स्वत:च्या द्राक्षेबागांतील काही झाडे काढून तब्बल दीड किलोमीटर लांबीचा रस्ता तयार केला आहे.शेतीच्या रस्त्याचा प्रश्न अनेक शेतकऱ्यांसाठी डोकदुखी ठरत आहे. त्यातच बागायती शेती असेल आणि रस्ता नसेल, तर शेत असून अडचण आणि नसून खोळंबा, अशीच अवस्था असते. शेतीला रस्ता मिळावा, यासाठी प्रशासनाकडे दाखल होणाऱ्या दाव्यांची संख्याही मोठी आहे. दावा दाखल झाल्यानंतर अनेक वर्षे सुनावणीसाठी हेलपाटे मारून आणि वकिलासाठी पैसे मोजण्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांचे अशा पध्दतीने होणारे नुकसान टाळण्यासाठी तहसीलदार सुधाकर भोसले यांनी महाराजस्व अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेतला. या अभियानांतर्गत तालुक्यातील सर्व पाणंद रस्ते खुले करणे, रस्ते नसलेल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करुन रस्त्याची सोय करुन देण्यासाठी मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेचा लाभ तुरचीतील शेतकऱ्यांना झाला आहे. तुरची येथील अनेक शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी वाट नव्हती. द्राक्षबागा असलेल्या शेतकऱ्यांची रस्त्याअभावी मोठी गैरसोय होत होती. वाट मिळावी, यासाठी प्रशासनाकडे दावाही दाखल करण्यात आला होता. या ठिकाणच्या शेतकऱ्यांना तहसीलदार भोसले यांनी मार्गदर्शन केल्यानंतर सर्वच शेतकऱ्यांनी रस्ता करण्यासाठी पुढाकार घेतला. खाशाबा चव्हाण, वसंत चव्हाण, राजाराम चव्हाण, रवींद्र चव्हाण, जगन्नाथ चव्हाण या शेतकऱ्यांनी रस्त्यासाठी अडसर ठरणाऱ्या स्वत:च्या द्राक्षबागा तोडून रस्ता तयार केला. त्यामुळे तुरचीत लोकसभागातून दीड किलोमीटर लांबीचा रस्ता तयार झाला. (वार्ताहर)शासनाच्या महाराजस्व अभियानांतर्गत पाणंद रस्ते खुले करुन देण्यासाठी विशेष मोहीम सुरु केली आहे. शेतकऱ्यांना रस्त्याचा प्रश्न जिव्हाळ्याचा आहे. शेतकऱ्यांची गैरसोय तसेच आर्थिक नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. या मोहिमेअंतर्गत आजअखेर २५ पाणंद रस्ते खुले केले आहेत. पाणंद रस्त्यांबाबत तक्रारी असल्यास प्रशासनाशी संपर्क साधवा. प्रशासनाकडून योग्य ते सहकार्य केले जाईल.- सुधाकर भोसले, तहसीलदार, तासगाव.
वादाच्या बिकट वाटेवरून सामंजस्याची वहिवाट...
By admin | Updated: December 21, 2015 00:50 IST