लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहर पोलीस ठाण्यातील महिला समुपदेशन केंद्रात गेल्या १४ वर्षात कौटुंबिक वादाची २ हजार ८०० प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली. या केंद्राकडून महिलांना कायदेशीर, वैद्यकीय, न्यायालय खटल्याबाबत मार्गदर्शन केले जात आहे.
प्रत्येक घरात कौटुंबिक वाद असतात. परंतु वाद वेळीच मिटला नाही तर त्याचे स्वरुप वाढते. अनेकजण पोलीस व न्यायालयात जातात. त्यातून संबंधित कुटुंबाला, नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. कौटुंबिक नातेसंबंध बिघडून सामाजिक स्वास्थ्यही हरवते. त्यासाठी शहर पोलीस ठाण्यात महिला समुपदेशन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. समाजातील अंध, अपंग, विवाहिता, विधवा, परित्यक्ता, वृद्ध, घटस्फोटीत महिलांना आधार देण्याचे काम केंद्राकडून केले जाते. फरिदा मुल्ला व स्मिता कुंभार या समुपदेशनाचे काम करतात. त्यांना भगिनी निवेदिता प्रतिष्ठानच्या अध्यक्षा नसीम शेख, सचिव नीता दामले यांचेही मार्गदर्शन लाभते.
या केंद्रात आजअखेर ३ हजार ५२४ तक्रारी झाल्या होत्या. त्यातील २ हजार ८३४ प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली. २१० प्रकरणात पोलीस ठाण्यात नोंद झाली असून ४२८ प्रकरणावर न्यायालयात दावे दाखल झाले. सध्या २४ खटले प्रलंबित आहेत. लाॅकडाऊनच्या काळात समुपदेशन केंद्राकडून १ हजार २०० बेघर, श्रमिकांना आधार देण्याचे काम करण्यात आले आहे.