येलूर : येलूर (ता. वाळवा) येथे गुरुवारी (दि. १५) नऊ व शुक्रवारी (दि. १६) सहा असे १५ कोरोना रुग्ण सापडले असून आतापर्यंत ८५ जणांना बाधा झाली आहे. यांपैकी नऊजणांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉ. डी. एस. पाटील यांनी दिली. वैद्यकीय सेवा वगळता सर्व व्यवहार रविवारपासून मंगळवारअखेर तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
ग्रामपंचायतीच्या कार्यालयात कुरळपचे साहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव, भगवानराव जाधव, उपसरपंच बाळासाहेब जाधव, रणजित आडके यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली.
कोरोना साखळी तोडण्यासाठी अत्यावश्यक वैद्यकीय सेवा, दूध संस्था, बँका वगळता संपूर्ण गाव तीन दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या काळात सर्व सार्वजनिक कार्यक्रम बंद राहतील. होम क्वारंटाईन किंवा होम आयसोलेशनने उपचार सुरू असणारे कोरोनाबाधित घराबाहेर फिरताना आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करणे, विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे, आपत्ती व्यवस्थापन समितीच्या वतीने गावातून गस्त घालणे असे निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आनंदराव पवार यांनी दिली.