सांगली : शिक्षण आणि पशुसंवर्धन विभागात कार्यारंभ आदेश नसताना कामे सुरू झाल्याची तक्रार बेडगचे जिल्हा परिषद सदस्य मनोज मुंडगनूर यांनी केली. त्यांच्या चौकशीचीही मागणी केली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी कारवाईमध्ये पक्षपाती करू नये, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हा परिषदेत भाजप सदस्यांची गोपनीय बैठकीत बांधकाम विभागातील संशयास्पद फायलींवर चर्चा झाली. त्यावेळी मुंडगनूर यांनी अनुभव सांगितला की, कार्यारंभ आदेश नसताना एक काम झाल्याचा मनस्ताप मला सोसावा लागला. त्यामुळे अधिकाऱ्यांनी प्रत्येक फायलीवर न्याय्य भूमिका घेण्याची मागणी त्यांनी केली.
ते म्हणाले, बेडग मतदारसंघात दलित वस्ती विकास कामाविषयी लोकांमध्ये गैरसमज होते. आमची कामे होत नसल्याची भावना निर्माण झाली होती. त्यामुळे हे मंजूर असलेले व कार्यारंभ आदेश तयार असलेले काम आम्ही पुढाकार घेऊन केले; पण गुडेवार यांनी त्याला आक्षेप घेत रद्द केले. याच न्यायाने ते प्रत्येक वेळी निर्णय घेतील, अशी अपेक्षा होती; पण सध्या वाळवा, पलूस, शिराळा तालुक्यांतील कामांची माहिती त्यांना नसावी. ती त्यांनी घेतली पाहिजे. या कामांच्या फायली महिनाभरापासून बांधकाम विभागात फिरत आहेत. त्याची कारणे गुडेवार यांनी शोधावीत.