सांगली : महापालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडीवेळी भाजपमधून फुटून काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान करणाऱ्या सहा नगरसेवकांचे खुलासे थातुरमातुर आहेत. या खुलाशाबाबत वकिलांशी चर्चा झाली असून, गुरुवार,दि. १८ रोजी या नगरसेवकांना अपात्र ठरवावे, यासाठी विभागीय आयुक्तांना पत्र देणार असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर, सभागृह नेते विनायक सिंहासने यांनी सांगितले.
महापौर, उपमहापौर निवडीवेळी भाजपचे नगरसेवक महेंद्र सावंत, स्नेहल सावंत, अपर्णा कदम, नसीम नाईक तसेच अपक्ष नगरसेवक विजय घाडगे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांना मतदान केले. भाजपचे नगरसेवक आनंदा देवमाने व शिवाजी दुर्वे हे दोघे गैरहजर राहिले होते. त्यामुळे भाजपला या निवडणुकीत पराभव स्वीकारला लावला. भाजपने या फुटीर नगरसेवकांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले होते. घाडगे वगळता इतर सहा सदस्यांना भाजपच्यावतीने नोटीसही बजाविण्यात आली होती. या सहा नगरसेवकांचे खुलासे पाच दिवसांपूर्वी भाजपकडे प्राप्त झाले.
त्यानंतर या खुलाशाबाबत मुंबईतील वकिलांशी चर्चा करण्यात आली. फुटीर सहा नगरसेवकांचे खुलासे अतिशय थातुरमातुर आहेत. त्यांनी भाजप विरोधात केलेले मतदान व अनुपस्थिती ही कृती समर्थनीय नाही. त्याबाबतचे आणखी पुरावे जमा करून गुरुवारी अपात्रतेसाठी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव दाखल करणार असल्याचे सिंहासने यांनी सांगितले.