कवठेमहांकाळ येथील बहिष्कृत चव्हाण कुटुंबाने पोलिसांत दाद मागितली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कवठेमहांकाळ येथील नंदीवाले समाजातील चार कष्टकरी कुटुंबांना जातपंचायतीने बहिष्कृत केल्याची तक्रार आहे. या कुटुंबांनी कवठेमहांकाळ पोलिसांत तक्रार अर्ज दिला असून, चौकशी सुरू आहे.
यल्लाप्पा चिनाप्पा चव्हाण (रा. काळे प्लॉट, कवठेमहांकाळ) यांच्यासह चार कुटुंबाना नंदीवाले जातपंचायतीने जागेच्या वादाचे निमित्त करून वाळीत टाकल्याचे तक्रार अर्जात म्हटले आहे. या कुटुंबांसोबत संबंध ठेवणाऱ्यांना ५००० रुपये दंड ठोठावला जाईल, असा फतवाही पंचांनी जाहीर केला आहे. पीडितांच्या मुलामुलींची लग्ने पंच मोडतात, घरात मयत झाल्यावर कोणी मदतीला येत नाही, रोजगारालासुद्धा बोलवत नाहीत. समाजातील कोणत्याही कार्यक्रमास बोलवत नाहीत, दमदाटी करतात. असा बहिष्कार अनेक दिवसांपासून सुरू असल्याची चव्हाण यांची तक्रार आहे. बहिष्कृत कुटुंबांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडेही तक्रार केली आहे. अंनिसचे राहुल थोरात यांनी ही माहिती दिली.
दरम्यान, थोरात यांनी सांगितले की, समिती पीडित कुटुंबांच्या पाठीशी असून, त्यांना न्याय मिळवून देईल. त्यांच्यावरील बहिष्कार जातपंचायतीने उठविण्याचे आवाहन करत आहोत.