लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी बुधवारी अचानक विविध विभागांना भेटी देऊन झाडाझडती घेतली. कार्यालयातील अस्तव्यस्त रेकाॅर्ड, जिन्यावरील पिचकाऱ्या पाहून त्यांनी संताप व्यक्त केला.
आयुक्त कापडणीस यांनी उपायुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता आप्पा हलकुडे, अभियंता वैभव वाघमारे यांना सोबत घेत बुधवारी सकाळी मुख्यालयासह सर्वच इमारतींचा पाहणी दौरा केला. सुरुवातीला मुख्यालयातील प्रभाग समिती एक, लेखा विभाग, प्रशासन विभागांना भेटी दिल्या. ऑगस्ट २०१९ मध्ये आलेल्या महापुरात लेखा विभागातील रेकाॅर्ड पाण्यात भिजून खराब झाले आहे. अजूनही हे रेकार्ड कपाटातून बाहेर काढलेले नाही. त्यानंतर शाळा नंबर एकच्या इमारतीतील आरोग्य, बांधकाम, नगररचना, लेखापरीक्षण विभागाला भेटी देऊन पाहणी केली.
अनेक विभागात कार्यालयीन साहित्य, जुनी रेकॉर्ड तसेच अन्य दप्तर हे अस्ताव्यस्त पसरलेले पाहून आयुक्तांनी विभागप्रमुखांकडे नाराजी व्यक्त केली. साहित्यासाठी बंदिस्त कपाटे व रेकॉर्ड रॅक तयार करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले.