कुंडल : क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड फाउंडेशन व क्रांतिअग्रणी समाज प्रबोधन संस्थेच्यावतीने दिला जाणारा ‘क्रांतिअग्रणी’ पुरस्कार यंदा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आ. ह. साळुंखे यांना जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती समूहाचे प्रमुख अरुण लाड यांनी आज, शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले की, येत्या ४ डिसेंबरला कुंडल ग्रामपंचायतीच्या पटांगणावर सायंकाळी साडेपाच वाजता पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व ज्येष्ठ विचारवंत अॅड. रावसाहेब शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. रुपये ५१ हजार रोख, मानचिन्ह, मानपत्र, शाल-श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. जी. डी. बापू लाड यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त दि. १ ते ४ डिसेंबर या कालावधीत कुंडल येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. क्रांतिअग्रणी समाज प्रबोधन संस्थेच्यावतीने १ ते ३ डिसेंबर या काळात क्रांतिअग्रणी व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. १ डिसेंबरला डॉ. सदानंद मोरे यांचे ‘संतांची शिकवण- काळाची गरज’ या विषयावर व्याख्यान, दि. २ रोजी कथाकार प्रा. रवींद्र कोकरे (फलटण) यांचा कथाकथनाचा कार्यक्रम व ३ रोजी साहित्यिक प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांचे ‘बदलते ग्रामीण जनजीवन’ या विषयावरील व्याख्यान आयोजित केले आहे. कार्यक्रमाचे आयोजन क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड फाउंडेशन, क्रांतिअग्रणी समाज प्रबोधन संस्था, क्रांती उद्योग व शिक्षण समूह तसेच कुंडल ग्रामसंसद यांच्यावतीने केले आहे. (वार्ताहर)
आ. ह. साळुंखे यांना ‘क्रांतिअग्रणी’ पुरस्कार
By admin | Updated: November 30, 2014 00:57 IST