लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरातील काॅलेज काॅर्नर येथे आमदार सुधीर गाडगीळ यांनी स्व-खर्चाने लावलेला दिशादर्शक फलक गायब झाला आहे. चौक सुशोभीकरणात महापालिकेने हा फलक काढून टाकला होता. एक फलक तिथेच पडून आहे. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी प्रशासनाला जाब विचारला. त्यानंतर महापालिकेने फलकाची शोधाशोध सुरू केली.
सांगली शहरात विविध चौकांत आमदार गाडगीळ यांनी दिशादर्शक फलक बसविले आहे. परगावातून येणाऱ्या प्रवाशांना शहरातून बाहेर पडताना या दिशादर्शक फलकाचा मोठा लाभ झाला आहे. काॅलेज काॅर्नर येथे त्यांनी दोन फलक उभारले होते. महिनाभरापूर्वी महापालिकेने चौक सुशोभीकरण व रुंदीकरणाचे काम हाती घेतले. रुंदीकरणावेळी दोन्ही फलक कापून काढण्यात आले. ते चौकाच्या एका कोपऱ्यात ठेवले होते. महापालिकेने हे फलक काढतानाही आवश्यक खबरदारी घेतली नाही. त्यापैकी एक फलक गायब असल्याची बाब भाजप कार्यकर्त्यांच्या लक्षात आली. त्यांनी गाडगीळ यांना माहिती दिली. गाडगीळ यांचे स्वीय सहायक अमोल कणसे यांनी उपायुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता संजय देसाई यांना फलकाबाबत जाब विचारला. महापालिकेने या गायब फलकाची शोधाशोध सुरू केली. फलक असल्याचे सांगितले; पण तो कुठे आहे, हे मात्र सायंकाळी उशिरापर्यंत स्पष्ट केले नाही.