सांगली : गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्याला विचित्र हवामानाचा फटका बसत आहे. आज (सोमवारी) दिवसभर सांगली, मिरज शहरांसह जिल्ह्याच्या काही भागामध्ये ढगाळ हवामान होते. सांगलीच्या काही भागामध्ये सकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. या वातावरणामुळे व्यापाऱ्यांनी द्राक्षाचे दर किलोला चार ते पाच रुपयांनी पाडल्यामुळे शेतकऱ्यांना एकरी लाखाचा फटका बसत आहे. शेतकऱ्यांच्यादृष्टीने ढगाळ हवामान आणि पाऊस हे मोठे संकट निर्माण झाले आहे. पुणे येथील भारतीय हवामानशास्त्र विभागाने उद्या (दि. ३१ रोजी) सांगली जिल्ह्याच्या काही भागामध्ये गडगडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ हवामान असून, आज सकाळी तापमानात कमालीची घट अनुभवण्यात आली. सकाळी थंडी आणि दाट धुक्याची झालर, तर दुपारी कडक ऊन आणि ढगाळ हवामान, अशा लहरी हवामानामुळे अवकाळीच्या संकटातून बचावलेल्या द्राक्षबागा, बेदाणा आणि रब्बी पिकांवर विपरित परिणाम होत आहे. तासगाव, जत, कवठेमहांकाळ, मिरज पूर्व भागातील द्राक्ष बागायतदारांनी बेदाणा शेडवर बेदाण्यासाठी द्राक्षे टाकली आहेत. परंतु, या हवामानाचा बेदाण्यावर परिणाम होणार असल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. दरम्यान, खानापूर, जत, कडेगाव, पलूस, वाळवा तालुक्याच्या काही भागामध्ये रब्बी पिकांची काढणी आणि मळणी चालू आहे. येथील शेतकऱ्यांनी ढगाळ हवामानामुळे मळण्या थांबविल्या आहेत. दि. ३१ रोजी सांगली जिल्ह्याच्या काही भागात ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. (प्रतिनिधी)बागायतदारांची संकटांची मालिका कायममार्च महिन्यातच सहावेळा अवकाळी पाऊस, गारपीट आणि ढगाळ वातावरणाने द्राक्ष बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. बागायतदारांसमोरील संकटांची मालिका सुरूच आहे. जिल्ह्यातील निर्यातक्षम द्राक्षांचेही मोठे नुकसान झाले असून, यंदा निर्यात पूर्णपणे थांबली आहे. मागणी असूनही व्यापारी द्राक्ष नेण्यास तयार नाहीत. त्यामुळे बागायतदारांवरील चिंतेचे ढग कायम आहेत.
ढगाळ हवामानाचा द्राक्षबागांना फटका
By admin | Updated: March 31, 2015 00:25 IST