अशोक पाटील - इस्लामपूर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी सहकार पॅनेलने बहुमत मिळवले आहे. आता माजी आमदार व बँकेचे माजी अध्यक्ष विलासराव शिंदे आणि शिराळ्याचे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांना अध्यक्षपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. राजारामबापू वस्त्रोद्योग संकुलाचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी यापूर्वीच अध्यक्षपदावर दावा केला आहे. जिल्हा बँकेतील कामाचा अनुभव पाहता, माजी अध्यक्ष बी. के. पाटील यांनाही संधी मिळू शकते.जिल्हा बँकेवर वाळवा तालुक्यातून दिलीप पाटील बिनविरोध निवडून आले आहेत. विलासराव शिंदे, बी. के. पाटील यांनाही निवडणुकीत यश मिळाले आहे. याच तालुक्यातील काँग्रेसचे सी. बी. पाटील यांनी बाजी मारून ताकद दाखवून दिली आहे.बँकेच्या निवडणुकीत शिराळा तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलत गेली. ऐनवेळी सत्यजित देशमुख व रणधीर नाईक यांनी निवडणूक न लढविण्याचा घेतलेला निर्णय मानसिंगराव नाईक आणि सी. बी. पाटील यांच्या पथ्यावर पडला आहे. यामध्ये कोणी कोणाला मदत केली, हे गुलदस्त्यात राहिले आहे.संधी कोणाला का दिली जाऊ शकते?माजी आमदार विलासराव शिंदे यांचा वाळवा तालुक्यात वेगळा गट आहे. सध्या त्यांच्याकडे राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पदाची धुरा आहे. आष्टा शहरात जयंत पाटील आणि विलासराव शिंदे यांचे वेगवेगळे गट असले तरी, अलीकडच्या राजकारणात त्यांनी मिळते-जुळते घेत एकत्र काम करण्याला प्राधान्य दिले आहे. जयंत पाटील यांच्या भविष्यातील राजकारणात शिंदे यांची सहकार्याची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याने, त्यांना पुन्हा एकदा अध्यक्षपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे.शिराळा विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांचे वर्चस्व जयंत पाटील यांना सलत आहे. भाजपची ताकद थोपविण्यासाठी माजी आमदार मानसिंगराव नाईक यांना अध्यक्षपदाची संधी मिळू शकते. या दोन माजी आमदारांव्यतिरिक्त दिलीप पाटील आणि बी. के. पाटील हेही अध्यक्षपदाच्या रांगेत आहेत. अंतिम निर्णय मात्र आमदार जयंत पाटील हेच घेणार आहेत.
माजी आमदार बँकेच्या अध्यक्षपदाचे दावेदार
By admin | Updated: May 8, 2015 00:19 IST