मिरज शासकीय रुग्णालयातून रेमडेसिविर इंजेक्शन चोरून काळाबाजार करणाऱ्या सुमित हुपरीकर यास पोलिसांनी अटक केली. या प्रकरणाच्या चाैकशीसाठी नियुक्त समितीने अहवाल दिल्यानंतर हुपरीकर याच्या निलंबनाचे आदेश अधिष्ठातांनी दिले. मात्र, हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर रुग्णालयातील साठ्यातून आणखी रेमडेसिविर इंजेक्शन गायब असल्याचे निष्पन्न झाल्याने संबंधित कर्मचाऱ्यांची चाैकशी सुरू आहे. इंजेक्शन काळाबाजार प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असल्याचा संशय असून यातील सूत्रधार व इतरांवर कारवाईची मागणी होत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार मिरज शासकीय रुग्णालयातून एकूण १२ इंजेक्शन गायब असल्याने सिव्हिल प्रशासनाकडून पाच ते सहा कर्मचाऱ्यांची अंतर्गत चौकशी सुरू आहे. यात पुरुष व महिला कर्मचारी सहभागी असल्याची शक्यता आहे. रुग्णालयातून इंजेक्शन देण्यासाठी सुमित हुपरीकर यास इतर पाच ते सहाजणांनी मदत केल्याची चर्चा आहे. याबाबत वैद्यकीय शिक्षण विभागाला अहवाल सादर करण्यात आला असून विभागाच्या निर्देशाने स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले.