फोटो ओळी : महापालिकेकडून ऑनलाइन जन्म-मृत्यू दाखल्याचे वितरण महापौर दिग्विजय सूर्यवंशी व आयुक्त नितीन कापडणीस यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. या वेळी उपमहापौर उमेश पाटील, स्थायी सभापती पांडुरंग कोरे, सभागृह नेते विनायक सिंहासने, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : नागरिकांना जन्म-मृत्यू दाखल्यासाठी महापालिकेत हेलपाटे मारावे लागणार नाहीत. आता पाच मिनिटांत त्यांना ऑनलाइन जन्म-मृत्यूचा दाखल मिळणार आहे, तोही घरबसल्या. या सेवेचे उद्घाटन गुरुवारी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आयुक्त नितीन कापडणीस यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी उपमहापौर उमेश पाटील, स्थायी सभापती पांडुरंग कोरे, सभागृह नेते विनायक सिंहासने, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, माजी नगरसेवक शेखर माने यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
आयुक्त कापडणीस म्हणाले की, महापालिकेच्या मंगलधाम इमारतीमधील जन्म-मृत्यू दाखल्याच्या कार्यालयात होणारी गर्दी आणि नागरिकांची गैरसोय पाहता दाखले ऑनलाइन देण्याचा निर्णय घेतला. आता नागरिकांना दाखल्यासाठी महापालिका कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. घरबसल्या किंवा जेथे असाल तेथून अवघ्या पाच मिनिटांत ऑनलाइन प्रक्रियेनंतर दाखला मिळू शकतो.
महापौर सूर्यवंशी म्हणाले की, जनतेची गैरसोय ओळखून आयुक्त कापडणीस आणि त्यांच्या टीमने केलेले काम कौतुकास्पद आहे. या सुविधेचा नक्कीच जनतेला फायदा होईल आणि वेळेची बचत होईल.
चौकट
असे मिळणार दाखले
महापालिकेच्या संकेतस्थळावरील जन्म-मृत्यू दाखल्यासाठी लिंक दिली आहे. त्या लिंकवर नाव, जन्मतारीख व इतर माहिती भरून ती सबमिट करावी लागेल. त्यानंतर दाखल्याची प्रत दिसेल. त्यावर क्लिक करून मोबाइल नंबर टाइप करावा लागेल. मोबाइलवर आलेला ओटीपी अपलोड केल्यानंतर आवश्यक प्रतीनुसार ऑनलाइन रक्कम भरावी लागणार आहे. त्यानंतर डिजिटल स्वाक्षरीची दाखल्याची प्रत संबंधित व्यक्तीला प्राप्त होणार आहे.