पेठ : कोरोनाची लस पूर्णपणे सुरक्षित असून याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत, नागरिकांनी न घाबरता लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन पेठच्या सरपंच मीनाक्षीताई महाडिक यांनी केले.
पेठ (ता. वाळवा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित कोरोना लसीकरण उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. सरपंच मीनाक्षीताई महाडिक यांच्याहस्ते लसीकरण मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.
महाडिक म्हणाल्या, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आपल्याकडे त्याचा फैलाव कमी दिसत असला तरी धोका तेवढाच वाढत आहे. नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत स्वच्छता, सुरक्षित अंतर, सॅनिटायझर व मास्कचा वापर नियमित करावा. त्यामुळे स्वत:, आपले कुटुंब आणि पर्यायाने समाज सुरक्षित राहील याची काळजी घ्यावी.
यावेळी जिल्हा परिषदचे बांधकाम सभापती जगन्नाथ माळी, पंचायत समिती सदस्य वसुधा दाभोळे, जिल्हा परिषद सदस्या संध्याताई पाटील, डॉ. वृषाली देवापुरे, सूर्यकांत शिंदे व पेठ प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवक, सेविका व कर्मचारी उपस्थित होते.