सांगली : गॅस सिलिंडर दरवाढ, वाढती महागाईच्या निषेधार्थ नागरिक जागृती मंच आक्रमक झाला आहे. सर्वपक्षीय कार्यकर्ते, सामाजिक संघटनांना एकत्र करीत लवकरच याविरोधात जनलढा उभारण्याचा इशारा मंचचे सतीश साखळकर यांनी दिला आहे.
साखळकर म्हणाले की, गॅस सिलिंडरचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. डिझेल, पेट्रोलने शंभरी पार केली आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत. राजकीय पक्ष त्याविरोधात आंदोलन करीत आहेत. महागाईविरोधात आंदोलनाला आणखी धार येण्यासाठी सर्वच पक्ष, सामाजिक संघटनांच्या वतीने एकत्रित आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे नियोजनही लवकरच केले जाईल. प्रत्येक नागरिकांनी आपापल्या घरासमोर, रस्त्यावर गॅस सिलिंडर ठेवून काळा झेंडा अथवा काळे कापड लावून केंद्र सरकारचा निषेध नोंदवायचा आहे. आंदोलनाची तारीख लवकरच निश्चित केली जाईल. सर्वसामान्य नागरिक जोपर्यंत आंदोलनात सहभागी होत नाही, तोपर्यंत केंद्र सरकारला जाग येणार नाही, असेही ते म्हणाले.