सांगली : पंचशीलनगर येथील दुर्गामाता मंदिराजवळ मध्यरात्री तीन चोरट्यांनी किराणा दुकान फोडण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांची चाहुल लागताच नागरिकांनी त्यांचा शोध घेतला. यावेळी एका अल्पवयीन चोरट्याला पकडण्यात यश आले. त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. अन्य दोघे चोरटे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले, अशी माहिती संजयनगर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक काकासाहेब पाटील यांनी दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पंचशीलनगर येथे दुर्गामाता मंदिराजवळ किराणा दुकान आहे. तीन चोरट्यांनी मध्यरात्री हे दुकान फोडण्याचा प्रयत्न केला. परिसरातील नागरिकांना आवाज आल्याने ते सतर्क झाले. त्यांनी शेजाऱ्यांना मोबाईल फोनद्वारे परिसरात चोरटे आले असल्याची माहिती दिली. माहिती समजल्यानंतर परिसरातील नागरिक एकत्र गोळा झाले. त्यांनी चोरट्यांचा शोध घेतला. दुकान फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांपैकी त्यांनी एका चोरट्याला पाठलाग करून पकडले, तर दोघे चोरटे अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले. या घटनेची माहिती संजयनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पळून गेलेल्या चोरट्यांचा शोध सुरू आहे.