सांगली : पाणी, चारा टंचाईतून महाराष्ट्राची मुक्तता करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिशन ‘टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी दि. ५ डिसेंबर रोजी मुंबईमधील सह्याद्री अतिथीगृहात मुख्य सचिवांसह सर्व विभागाचे सचिव, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता, विभागीय आयुक्तांसह अधिकाऱ्यांना कार्यशाळेस बोलविली आहे. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे मार्गदर्शन करणार आहेत.पश्चिम महाराष्ट्रात टंचाईची फारशी परिस्थिती नसली तरी मराठवाडा, विदर्भात शेकडो गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वर्षोन वर्षे टंचाईचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र टंचाईमुक्त करण्यासाठी काय करावे लागेल, याचा अभ्यास फडणवीस करत आहेत. यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील पाणी विषयावर जनजागृतीचे काम करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, आदर्श सरपंच पोपटराव पवार आदी मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी ‘जलसंधारणातून टंचाईवर कायमस्वरूपी मात’ आणि ‘टंचाईमुक्त महाराष्ट्रासाठी कृती कार्यक्रम’ या विषयांवर जलसंधारण विभागाचे सचिव मार्गदर्शन करणार आहेत. याचबरोबर राज्यातील जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)
मुख्यमंत्र्यांचे मिशन ‘टंचाईमुक्त महाराष्ट्र’
By admin | Updated: November 28, 2014 23:47 IST