ओळ : मिरज पंचायत समितीच्या नूतन सभापती गीतांजली कणसे यांचा खासदार संजयकाका पाटील यांच्या हस्ते सत्कार झाला.
लाेकमत न्युज नेटवर्क
मिरज : जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलाबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्याशी चर्चा झाली आहे. त्यांची पदाधिकारी बदलास संमती असल्याने, जिल्हा परिषदेतही लवकरच पदाधिकारी बदल करण्यात येईल, अशी माहिती खासदार संजयकाका पाटील यांनी दिली.
मिरज पंचायत समितीच्या सभापतीपदी बेडगच्या गीतांजली कणसे यांची खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रयत्नाने बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर कणसे यांचा खासदार पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. पाटील म्हणाले, जिल्हा परिषदेमध्ये पदाधिकारी बदलाची सदस्यांची मागणी आहे. निवडून आलेले काही सदस्य नवीन आहेत, ते पुन्हा निवडणूक लढवतील की नाही, हे सांगता येत नाही. जिल्हा परिषदेच्या इतर सदस्यांनाही संधी मिळाली पाहिजे. अशी सदस्यांची अपेक्षा आहे. काही सदस्यांनी माझ्याकडेही पदाधिकारी बदलाची मागणी केली आहे. पदाधिकारी बदलाचा निर्णय वरिष्ठ नेते घेणार आहेत. याबाबत आपण पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांच्याशी दोन महिन्यांपूर्वी चर्चा केली आहे. त्यांची पदाधिकारी बदलाबाबत सकारात्मक भूमिका आहे. कोरोना महामारीच्या संकटामुळे आतापर्यंत पदाधिकारी बदल शक्य झाला नाही. कोरोना परिस्थितीत सुधारणा होत असल्याने, जिल्हा परिषदेतही लवकरच पदाधिकारी बदल हाेईल.
चौकट
बंडगर यांना न्याय देऊ
गतवेळी मिरज पंचायत समितीच्या उपसभापती निवडीत गैरसमज व मतभेदामुळे किरण बंडगर यांचा पराभव झाला असला, तरी सभापती निवडीच्या माध्यमातून सदस्य एकत्र आले आहेत. मतभेद व गैरसमज दूर झाले असल्याने किरण बंडगर यांना निश्चित न्याय देऊ, असे आश्वासन खासदार संजयकाका पाटील यांनी यावेळी दिले.