जत : जत पंचायत समितीचे सभापतीपद अडीच वर्षाचा कार्यकाल पूर्ण होईपर्यंत लक्ष्मी मासाळ यांच्याकडेच राहील. त्यात कोणताही बदल केला जाण्याचा प्रश्नच नाही. तालुक्यातील सर्व काँग्रेसच्या सदस्यांचा विकास कामासाठी त्यांना कायम पाठिंबा राहील, अशी ग्वाही आमदार पतंगराव कदम यांनी दिली.जिल्हा परिषदेचे माजी सभापती आकाराम मासाळ यांनी सांगली बाजार समिती निवडणुकीसाठी वसंतदादा रयत पॅनेलला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यानिमित्त बाज (ता. जत) येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, आकाराम मासाळ यांना आम्ही सामावून घेतले आहे. पुढील काळात त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. पक्षातर्फे त्यांना सन्मानाची वागणूक दिली जाईल. जात, धर्म व राजकीय पक्ष बघून आम्ही कोणालाही उमेदवारी दिली नाही. कार्यकर्त्यांनी बाजार समितीत परिवर्तन करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आम्ही सक्षम उमेदवार दिले आहेत. यापुढील काळात जिल्हा बँक, सांगली महापालिका येथे लक्ष घालणार आहे.माजी खा. प्रतीक पाटील म्हणाले, जत तालुक्यातील म्हैसाळ योजनेच्या अपूर्ण कामाकडे खा. संजय पाटील व आ. विलासराव जगताप यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे भीषण दुष्काळी परिस्थिती असूनही येथे पाणी आले नाही. यापुढील काळात या कामासाठी पैसे येतील याची शाश्वती नाही.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत म्हणाले, चारशे कोटी रुपयांचा डफळे साखर कारखाना आ. जयंत पाटील यांनी गिळंकृत केला आहे. मग बाजार समितीला ते कसे काय सोडतील? यावेळी माजी आमदार अजितराव घोरपडे, दिनकर पाटील, माजी सभापती सुरेश शिंदे, मन्सूर खतीब, बसवराज पाटील, पी. एम. पाटील यांची भाषणे झाली. जिल्हा बँकेचे संचालक विक्रम सावंत, जिल्हा परिषद सदस्य भीमराव माने, पृथ्वीराज पाटील, प्रभाकर थोरात, संजय गडदे, गुंडा पाटील, नाना थोरात, आप्पा मासाळ, आप्पा बिराजदार, नाथा पाटील, काका शिंदे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)मासाळांच्या भूमिकेची चर्चा आकाराम मासाळ यांनी उघडपणे आ. विलासराव जगताप यांच्याविरोधात बंड पुकारून जाहीरपणे वसंतदादा रयत पॅनेलचा प्रचार करण्याचा घेतलेला निर्णय जगताप यांना दिलेला राजकीय धक्का आहे, असे येथे मानले जात आहे. मासाळ यांच्या या निर्णयाने जत तालुक्यातील राजकारणाला कलाटणी मिळणार आहे, अशी चर्चा या कार्यक्रमातील उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये होती.
जतचे सभापतीपद लक्ष्मी मासाळ यांच्याकडेच
By admin | Updated: August 6, 2015 22:57 IST