ओळ : ऐतवडे बुद्रुक (ता. वाळवा) येथील दगडी चक्रव्यूह रचनेची केंद्रीय पुरातत्व विभागाच्या प्रादेशिक संचालक डॉ. नंदिनी साहू, पुरातत्व अभ्यासक सचिन पाटील, शहाजी गायकवाड व पथकाने पाहणी केली.
फाेटाे : २३ ऐतवडे २
ओळ : ऐतवडे बुद्रुक (ता. वाळवा) येथे इंडो-रोमन व्यापार संबंध दर्शविणाऱ्या पाऊलखुणा दिसून येतात.
लाेकमत न्यूज नेटवर्क
ऐतवडे बुद्रुक : ऐतवडे बुद्रुक (ता. वाळवा) येथे आढळलेल्या दगडी चक्रव्यूहाची केंद्रीय पुरातत्व विभागाच्या प्रादेशिक संचालक डॉ. नंदिनी साहू यांच्यासह पथकाने पाहणी केली. ही चक्र कोणी व कोणत्या कालखंडात तयार केली असावीत, याबाबत संशाेधन सुरु आहे. प्राचीन व्यापारी मार्ग तसेच घटनास्थळावरील काही सूक्ष्म निरीक्षणे नोंदविण्यात आली. दगडावर कोरून काढलेली वलये तसेच परिसरात सापडलेल्या पुरातत्वीय अवशेषांचीही पाहणी पथकाने केली.
ऐतवडे बुद्रुक येथील माळावर प्राचीन दगडी चक्रव्यूह रचना आढळून आली आहे. याबाबत पुरातत्व अभ्यासक सचिन पाटील यांनी संशाेधन केले आहे. याची दखल घेऊन केंद्रीय पथकाने येथे भेट दिली. प्राचीन भारतीय व्यापारी मार्ग व इतिहासपूर्व कालखंडातील व्यापार या गोष्टींचा दुवा तसेच या चक्रव्यूह संरचनेचे ठिकाण, व्यापारी मार्ग यांचा परस्पर संबंध तपासण्यात आला. ऐतवडे बुद्रुक परिसरामध्ये प्राचीन व नामशेष झालेल्या जंगम वस्ती परिसरात सापडलेल्या या पुरातत्वीय अवशेषांची पाहणी व काही ठिकाणी उत्खननाबाबत डॉ. साहू यांनी सूचना केल्या.
शहाजी गायकवाड यांनी डॉ. साहू व पथकाचे स्वागत केले. गायकवाड म्हणाले, पुरातत्व अभ्यासक सचिन पाटील यांनी गेली पाच वर्ष डेक्कन कॉलेजच्या पुरातत्व शाखेचे विभागप्रमुख डॉ. साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करून याबाबतचा शोधनिबंध लंडन येथील ‘केडोरिया द जर्नल ऑफ मेझ अँड लिब्रिन्थ’ या सुवर्ण महोत्सवी नियतकालिकात प्रकाशित केला. त्यानंतर या अवशेषांचे महत्त्व समाेर आले. प्राचीन काळातील भारतीय व्यापारी मार्गावर असणारे हे अवशेष जिल्ह्याचे पुरातत्वीय भूषण आहे.
यावेळी केंद्रीय पुरातत्त्व पथकाचे अधिकारी सौरभ मेहता, अभियंता नीलेश सोनवणे, कोल्हापूर येथील इतिहास अभ्यासक गणेश नेर्लेकर-देसाई, कुरळपचे खंडेराव घनवट व ग्रामस्थ उपस्थित होते.