सांगली : शहरातील कोरोनास्थिती नियंत्रणात येत असली तरी अद्यापही संसर्ग कायम आहे. अशा वातावरणात गणेशोत्सव सुरू होत असून, मंडळांनी गेल्या वर्षी जपलेली सामाजिक बांधिलकी यंदाही जपत साधेपणाने उत्सव साजरा करावा. काेरोनाविषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन अप्पर पाेलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी शुक्रवारी येथे केले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गणेश मंडळांचे पदाधिकारी, नगरसेवक व शांतता कमिटीच्या सदस्यांची बैठक पाेलीस मुख्यालयात झाली. या वेळी अप्पर अधीक्षक दुबुले बोलत होत्या. या वेळी प्रांताधिकारी समीर शिंगटे, उपअधीक्षक अजित टिके, उपायुक्त राहुल रोकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
दुबुले म्हणाल्या, गेल्या दीड वर्षापासून सर्व जण कोरोनाचा सामना करत असल्याने ताण वाढला आहे. पोलीस कर्मचारीही कोरोना नियंत्रणासाठी नेहमीच कार्यरत राहत आहेत. गेल्या वर्षी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करत गणेश मंडळांनी आदर्श घालून दिला होता. या वर्षीही कोरोनास्थिती कायम आहे. त्यामुळे गर्दी टाळण्याबरोबरच साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केल्यास संसर्ग टाळण्यास मदत होईल.
पदाधिकाऱ्यांनीही सूचना मांडत पोलीस प्रशासनाकडून अपेक्षा व्यक्त केल्या.
चौकट
मंडळांनी सामाजिक बांधिलकी जपावी
अप्पर अधीक्षक दुबुले म्हणाल्या, कोरोनामुळे अनेक कुटुंबांतील कर्ते पुरुष गेले आहेत. अशा कुटुंबांना आधार देण्यासाठी गणेश मंडळांनी पुढाकार घ्यावा. अवास्तव खर्चाला फाटा देऊन समाजाला उपयोगी ठरेल असे उपक्रम राबविल्यास पोलीस सहकार्य करतील.