अशोक पाटील ल्ल इस्लामपूर- वाळवा आणि कऱ्हाड तालुक्याच्या सीमेवरील रेठरे बुद्रुकच्या यशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखान्याच्या फडात दिवाळखोरीचा फड रंगू लागला आहे. निवडणूक तोंडावर आल्याने मोहिते आणि भोसले घराणी एकमेकांवर तुफानी टीका करू लागली आहेत. मात्र, मोहिते-भोसले यांनीच ‘कृष्णा’ची वाट लावली असल्याचे सभासदांतून बोलले जात आहे. ही टीकाटिप्पणी पाहताना हे सर्वच नेते जोमात आणि सभासद मात्र कोमात चालल्याचे दिसत आहे.कारखाना दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असल्याचा आरोप माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते करीत आहेत, तर विद्यमान अध्यक्ष अविनाश मोहिते कारखाना सुस्थिस्तीत असल्याचा दावा करत तयारीला लागले आहेत. इंद्रजित मोहिते आणि मदन मोहिते यांचे ‘कृष्णा’वर सावटही पडू नये, यासाठी डॉ. सुरेश भोसले, डॉ. अतुल भोसले यांनी फिल्डिंग लावली आहे, तर मदन मोहिते यांनी सवतासुभा मांडून डॉ. इंद्रजित मोहिते यांना शह देण्याची तयारी सुरू केली होती, परंतु या दोघांनी आज (सोमवारी) मच्छिंद्रनाथ गडावर एकत्र येऊन आगामी निवडणूक एकदिलाने लढविण्याची शपथ घेतली. दोन्ही नेत्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या समर्थकांत संभ्रम निर्माण झाला आहे. ‘कृष्णा’च्या निवडणुकीचे बिगूल वाजण्याअगोदरच डॉ. इंद्रजित मोहिते यांनी कऱ्हाड, वाळवा, कडेगाव तालुका पिंजून काढला आहे. त्यांचा संपर्क दौरा त्यांच्याच घरातील मदन मोहिते यांच्या कार्यकर्त्यांना रुचत नसल्याने मदन मोहिते समर्थकांनीही स्वतंत्रपणे संपर्क सुरू केला आहे. अविनाश मोहिते यांच्याविरोधात मदन मोहिते यांच्याच नेतृत्वाखाली पॅनेल उभे करण्याचा निर्णय काही कार्यकर्त्यांनी घेतल्याने, इंद्रजित मोहिते यांच्या कार्यकर्त्यांत अस्वस्थता पसरली आहे. दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असणारा कारखाना सक्षमपणे उभा करण्यासाठी डॉ. इंद्रजित मोहिते हेच सक्षम असल्याचा दावा त्यांचे समर्थक करीत आहेत. याउलट कारखाना सुस्थितीत आणण्यासाठी मदन मोहिते यांचेच नेतृत्व योग्य असल्याचा दावा त्यांचे समर्थक करीत आहेत. त्यामुळे या दोघांतील दरी रुंदावत चालली आहे. एकीकडे अविनाश मोहिते यांनी तोंडात साखर व डोक्यावर बर्फ ठेवून पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे ऊसदर, कर्मचाऱ्यांचे पगार, ऊस तोडीचा प्रश्न व आर्थिक संकटात सापडलेल्या कारखान्याचे धिंडवडे काढण्यासाठी डॉ. इंद्रजित मोहिते आक्रमक झाले आहेत.गत निवडणुकीत मोहिते-भोसले मनोमीलनाला बसलेला झटका डॉ. इंद्रजित मोहिते यांना चांगलाच जिव्हारी लागला होता. त्यातून त्यांनी विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मदत करून भाजपचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांना आव्हान दिले होते. तेव्हापासून डॉ. भोसले पिता-पुत्रांनी इंद्रजित व मदन मोहिते यांचे सावटही कारखान्यावर पडणार नाही, अशी व्यवस्था करण्यास सुरुवात केली आहे. ते काय ओबामा आहेत काय?पाच वर्षांपासून अज्ञातवासात असलेल्या मदन मोहिते यांना आता अचानक ‘कृष्णा’च्या अध्यक्षपदाचे वेध लागले आहेत. त्यांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा करण्यासाठी पत्रकारांना आमंत्रित केले होते. परंतु काही कारणास्तव त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला नाही. त्याचा गाजावाजा मात्रा मोठ्या प्रमाणात झाला. ते स्वत:ला ओबामा समजतात काय? असा सवाल अविनाश मोहिते समर्थकांतून केला जात आहे.
‘कृष्णा’च्या फडात दिवाळखोरीचा वग
By admin | Updated: March 24, 2015 00:13 IST