कडेगाव : राज्य सरकारने मराठा आंदोलकांवर दाखल असलेले गुन्हे रद्द करण्याची विनंती स्थानिक न्यायालयांना केली होती. यानुसार कडेगाव तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चातील ४२ आंदोलकांना दिलासा मिळाला आहे. सरकार पक्ष सदरची केस पुढे चालविण्यास तयार नसल्याने फौजदारी प्रक्रिया संहिता कलम ३२१ प्रमाणे केस काढून टाकण्यात आली आहे, असा आदेश कडेगावचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वि. रा. घराळ यांनी सोमवारी दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कडेगाव येथील न्यायालयात मराठा क्रांती मोर्चाचे राहुल पाटील व दादासाहेब यादव यांच्यासह ४२ जणांविरुद्ध खटला सुरू होता. या सर्वांनी मराठा समाजास आरक्षण मिळावे, या मागणीसाठी २७ जुलै २०१८ रोजी आंदोलन केले होते. जमाव बंदी आदेशाचे उल्लंघन करून रस्त्यात टायर पेटवून रास्ता रोको व ठिय्या आंदोलन केले होते. याप्रकरणी प्रमुख ४२ जणांविरुद्ध कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. यानंतर सरकारच्या आदेशाप्रमाणे फौजदारी प्रक्रिया कलम ३२१ प्रमाणे केस मागे घेण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. हा अर्ज १२ नोव्हेंबर २०२० रोजी कडेगाव न्यायालयात सादर केला होता.
यावर सोमवार, दि. २२ रोजी न्यायालयाच्या आदेशानुसार तालुक्यातील ४२ आंदोलकांविरुद्धचा खटला मागे घेण्यात आला आहे.
चौकट
"न्याय हक्कासाठी लढतच राहू"
सरकारने गुन्हे मागे घेऊन दिलासा दिला. मात्र, मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण दिले पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी लढत आहोत. आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नाही. आम्ही लढतच राहू, असा निर्धार खटल्यातून बाहेर पडलेले राहुल पाटील यांनी व्यक्त केला.