कुपवाड : शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने केलेल्या मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ३१ प्राध्यापकांच्या बदल्या रद्द कराव्यात व सातारा येथे सुरू करण्यात येत असलेल्या नव्या वैद्यकीय महाविद्यालयात नवीन प्राध्यापकांच्या बदल्या करून मगच वैद्यकीय शिक्षण परिषदेच्या तपासणीला सामारे जावे, अशी मागणी जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील यांनी पत्रकार बैठकीत केली.
पाटील म्हणाले की, शासनाने अचानक मिरजेतील डॉक्टरांच्या बदल्या सातारा येथे केल्या. मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांनी याबाबत महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी त्यांनी सातारा येथील नव्याने सुरू होणाऱ्या महाविद्यालयात प्रशासकीय कारणासाठी त्या बदल्या केल्याचे सांगितले. हे डॉक्टर्स मिरजेतच राहतील, असेही त्यांनी त्यांना सांगितले. शासनाचा हा निर्णय खासगी शिक्षण संस्थांना शोभणारा आहे. एकच शिक्षक दोन ठिकाणी काम करीत असल्याचे दाखवून तपासणीतून पार पडण्याचा चमत्कार खासगी संस्थांना शोभेल, असा आहे. या बदल्या त्वरित रद्द कराव्यात.