संख : संख (ता. जत) येथील साखळी बंधारे कामामध्ये गैरव्यवहार केलेल्या तत्कालीन कृषी सहायक एस.के. थोरात यांच्यावर कारवाई करून बढती रद्द करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कृषिमंत्री दादा भुसे, जिल्हा कृषीअधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, एस.के. थोरात संख येथे कृषी सहायक म्हणून कार्यरत असताना गोंधळेवाडी, संख येथील साखळी बंधाऱ्याचे बांधकामे निकृष्ट दर्जाचे झालेली आहेत. गोंधळेवाडी येथील साखळी बंधारे पहिल्याच पावसात वाहून गेले होते. याबाबत शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे केली होती.
संख येथील तिल्याळ ओढापात्रातील साखळी बंधाऱ्याचे कामे निकृष्ट दर्जाची केली आहेत. पंखे मातीवर बांधले असल्याने ढासळून पडले आहेत. याबाबत महादेव गुरसिद्धाप्पा बिरादार, मल्लिकार्जुन बिरादार आण्णासाहेब बिरादार, भागीरथी राचाप्पा यरनाळ या शेतकऱ्यांनी तक्रार केली होती. त्याची कोणतीही दखल घेतली नाही.
बंधाऱ्यामध्ये पाणी न थांबता गळती होत आहे. बांध फुटून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याच्या तक्रारी असतानाही चौकशी झाली नाही. उलट अशा कृषी सहायकाला मंडल कृषी अधिकारी म्हणून बढती मिळाली आहे. साखळी सिमेंट बंधारे कामामध्ये गैरव्यवहार करणाऱ्या तत्कालीन कृषी सहायक थोरात यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा कृषी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.
निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जत तालुकाध्यक्ष भीमाशंकर बिरादार, संख मंडल युवा अध्यक्ष सिदगोंडा बिरादार यांच्या सह्या आहेत.