खरसुंडी : शेतकरी वर्गासाठी पांढरं सोनं समजल्या जाणाऱ्या कापसाच्या खरेदीवर व्यापाऱ्यांनी खरसुंडी बाजारात बहिष्कार घातल्याने शेतकऱ्यांची बाजारात मोठी गैरसोय झाली. सुरुवातीला खरसुंडी बाजारात कापसाला ६000 ते ६५00 भाव दिला गेला. नंतर पुढील आठवड्यात व्यापाऱ्यांनी ५000 ते ५५00 कापसाचा भाव केल्याने शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांशी वाद केला. त्यामुळे व्यापाऱ्यांची बैठक होऊन, या रविवारी बाजारात कापसाचा काटा न लावता व्यापारी आले नाहीत. त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. कमिटीचे भाऊसाहेब गायकवाड, ग्रा. पं. सदस्य व शेतकरी यांनी बैठक घेऊन व्यापाऱ्यांशी चर्चा केली असता, व्यापाऱ्यांनी गावामध्ये शेतकरी व काही लोक हुल्लडबाजी करून व्यापाऱ्यांना त्रास देत असल्याने खरसुंडीत कापूस खरेदीचा काटा लावला जात नाही, असे सांगितले. गेले दोन आठवडे शेतकरी आपला कापूस घेऊन बाजारात येत आहेत, परंतु बाजारातील या गोंधळामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.सध्या पावसाचे वातावरण असून, कापूस बाजारात घेऊन येणे आणि न विकता परत घेऊन जाण्यासाठी तो व्यवस्थित सांभाळून पुन्हा दुसरीकडे विक्रीसाठी घेऊन जाणे, यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. सुरुवातीला पाऊस न झाल्याने कापूस जगविणे, त्यानंतर तयार कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने, हे पीक घेतले नसते तर बरे झाले असते, अशी व्यथा काही शेतकरी व्यक्त करीत होते. (वार्ताहर)
व्यापाऱ्यांचा कापूस खरेदीवर बहिष्कार
By admin | Updated: August 4, 2014 00:11 IST